क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी विधानसभेत केले स्पष्ट

पणजी : वन-म्हावळिंगे (Van-Mhavlinge) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम (International cricket stadiums) उभारले जाणार असल्याच्या चर्चांना क्रीडामंत्री रमेश तवडकर (Ramesh Tawadkar) यांनी पूर्णविराम दिला आहे. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सध्या क्रीडा खात्याकडे प्राप्त झालेला नाही किंवा सरकारच्या विचाराधीन नाही, असे लेखी स्पष्टीकरण क्रीडामंत्र्यांनी विधानसभेत दिले आहे. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. आता या प्रकल्पाबाबत असलेल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी वन-म्हावळिंगे येथील गोवा क्रिकेट संघटनेच्या जमिनीवर स्टेडियम उभारण्याबाबत सद्यस्थिती काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना क्रीडामंत्र्यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय स्टेडियमसाठी सरकारने धारगळ येथील जमिनीची निवड केली असून ती जागा आधीच जीसीएला हस्तांतरित करण्यात आली आहे. धारगळ येथे स्टेडियम उभारण्यासाठी सरकारने एकूण ९,१९,७८९ चौमी जमीन संपादित केली होती, त्यापैकी १,८९,९३० चौमी जमीन ३३ वर्षांच्या भाडेतत्त्वावर गोवा क्रिकेट संघटनेला देण्यात आली आहे.
६ सप्टेंबर २०१८ रोजी या संदर्भातील भाडेकरार पूर्ण झाला असून, हा कालावधी २०५१ मध्ये संपुष्टात येणार आहे. या जमिनीसाठी गोवा क्रिकेट संघटनेकडून १९ कोटींची हमी रक्कम घेण्यात आली आहे. धारगळ येथील नियोजित स्टेडियम उभारण्याची संपूर्ण जबाबदारी ही गोवा क्रिकेट संघटनेची असेल, असेही क्रीडामंत्र्यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे. त्यामुळे भविष्यात गोव्याचे हक्काचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे वन-म्हावळिंगे ऐवजी धारगळ येथेच साकारले जाणार असल्याचे आता अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे.