शिवांग शिरोडकरची ऐतिहासिक झेप : ३००० स्पर्धकांमधून झाली निवड

वाळपई : ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी देशातील तरुणांच्या संकल्पनांना व्यासपीठ देणाऱ्या ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ मध्ये गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. म्हापसा येथील सेंट झेवियर्स कॉलेजचा विद्यार्थी व सध्या बीएससी इन फिजिक्स व ऑनलाईन डेटा सायन्स कोर्स करीत असलेला शिवांग शिरोडकर याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी प्राप्त झाली.
देशभरातील ३००० हून अधिक प्रतिभावान स्पर्धकांमधून केवळ २५ सर्वोत्तम ‘प्रेझेंटर्स’ची निवड करण्यात आली. त्यात मूळचा वाळपई (सत्तरी) येथील सुपुत्र शिवांगने आपले स्थान निश्चित केले. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे विशेष कार्यक्रमात त्याने पंतप्रधानांशी संवाद साधला.
शिवांगने आपल्या सादरीकरणात ‘फिट भारत, हिट भारत’ या विषयावर भाष्य केले आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशातील तरुण पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे किती आवश्यक आहे, यावर त्याने भर दिला. क्रीडा संस्कृती, आरोग्यदायी जीवनशैली आणि तरुणांमधील ऊर्जा या विषयांवर त्याने आपले नाविन्यपूर्ण विचार पंतप्रधानांसमोर मांडले.
निवड प्रक्रिया आणि सन्मान
या निवडीपूर्वी विविध स्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. गोव्याचे राज्यपाल पी. ए. गजपती राजू तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांनीही नुकतेच शिवांगसह इतर प्रतिनिधींचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ३००० तरुण नेत्यांमधून केवळ २५ जणांत स्थान मिळवणे ही शिवांगची शैक्षणिक आणि वक्तृत्व क्षेत्रातील मोठी उपलब्धी मानली जात आहे. वाळपईवासीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे माजी आमदार अशोक परब व माजी उपसभापती नरहरी हळदणकर यांनी सांगितले.