संशयित लिओनोवला १४ दिवसांची पोलीस कोठडी : संशयिताच्या जबानीने पोलीस हादरले

म्हापसा/पेडणे : उत्तर गोव्यातील हरमल आणि मोरजी येथे दोन रशियन महिलांच्या हत्येने खळबळ उडाली असतानाच, संशयित रशियन नागरिक आलेक्सी लिओनोव याने तिसऱ्या हत्येचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. १४ जानेवारी रोजी मादक पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या मृदुस्मिता सायकीया (रा. कोरगाव, मूळ आसाम) या महिलेचा खूनही आपणच केल्याची कबुली त्याने दिली आहे. आतापर्यंत १५ जणांना ‘मोक्ष’ दिल्याचे सांगणाऱ्या या 'सिरीयल किलर'ला न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस त्याच्या आंतरराज्य गुन्ह्यांचा कसून तपास करत आहेत.
हरमल-बामणभाटी येथे गुरुवारी एलिना कास्तानोव्हा या ३७ वर्षीय रशियन युवतीचा गळा चिरून खून झाल्याचे उघड झाल्यानंतर शुक्रवारी एलिना वानिवा या आणखी एका ३७ वर्षीय रशियन युवतीचा मृतदेह मोरजी येथे आढळून आला. तिचाही गळा चिरून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या दुहेरी खून प्रकरणातील धक्कादायक योगायोग म्हणजे मृत दोन्ही महिला आणि संशयित आरोपी या तिघांचेही वय ३७ वर्षे आहे.
तपास पथकापुढील आव्हाने
संशयित आलेक्सी हा चौकशीदरम्यान वेगवेगळ्या जबान्या देऊन पोलिसांना गोंधळात टाकत आहे. मात्र, त्याच्या गुन्हेगारीच्या पद्धतीवरून तो एखादा सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. सध्या संशयित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निगराणीत असून, त्याने गोव्यात इतर कुठे गुन्हे केले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याला विविध ठिकाणी घेऊन जात आहेत.
‘मोक्ष’ देण्याच्या नावाखाली हत्याकांड
संशयित आलेक्सी लिओनोवने पोलिसांना सांगितले की, तो लोकांना ‘मोक्ष’ देण्याचे काम करतो. दोन्ही महिलांचा खून आपणच केल्याची कबुली त्याने दिली आहे. इतकेच नव्हे तर, गोव्याव्यतिरिक्त हिमाचल प्रदेशातही त्याने काही व्यक्तींची हत्या केल्याचे कबूल केले आहे. आरोपीच्या दाव्यानुसार, त्याने आतापर्यंत १५ हून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. तो केवळ महिलाच नव्हे, तर पुरुषांनाही आपले सावज बनवायचा.
पोलीस यंत्रणा सतर्क
संशयित आलेक्सी हा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी असे दावे करत आहे की तो खरोखरच ‘सिरीयल किलर’ आहे, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. संशयिताने दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे. हिमाचल प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून तेथील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्या जात आहेत. या माहितीची पूर्ण खातरजमा झाल्याशिवाय कोणताही अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
विकृत कृत्याचा पर्दाफाश
* लिओनोव हा रशियन युवतींनाच आपले लक्ष्य बनवत असे. प्रथम त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा.
* पोलीस चौकशीतून असे समोर आले आहे की, तो युवतींना विश्वासात घेऊन हसत-खेळत त्यांचे हात पाठीमागे बांधायचा आणि त्यानंतर त्यांच्यावर अनन्वित शारीरिक अत्याचार करायचा.
* अत्याचार केल्यानंतर तो अतिशय क्रूरपणे धारदार शस्त्राने या महिलांचा गळा चिरून त्यांची हत्या करत असे.
संशयिताला १४ दिवसांची कोठडी
दोघा रशियन महिलांच्या खून प्रकरणात मांद्रे पोलिसांनी संशयित आरोपी आलेक्सी लिओनोव याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. या संशयिताने आणखी काही हत्या केल्याचा पोलिसांना दाट संशय असून, त्या दिशेने तपास चक्रे फिरू लागली आहेत.
आसामी महिलेला अति ड्रग्ज
पाजून मारल्याचे गुपित उघड
दुहेरी हत्याकांडाचा तपास करत असलेल्या पोलिसांसमोर संशयित लिओनोवने तिसऱ्या खुनाचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तुये येथील इस्पितळात मृत घोषित करण्यात आलेल्या मृदुस्मिता सायकीया (४०, रा. बालखाजन-कोरगाव, मूळ आसाम) या महिलेची हत्या आपणच केल्याची कबुली त्याने दिली आहे. या कबुलीमुळे आता लिओनोवने एकूण तीन महिलांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मृदुस्मिता हिचा १४ जानेवारी रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यावेळी तिला मादक पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू आल्याचा संशय व्यक्त करून पेडणे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून या प्रकरणाची नोंद केली होती. मात्र, मांद्रे पोलिसांनी जेव्हा लिओनोवची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने या महिलेचा खून केल्याची माहिती देऊन पोलिसांना हादरवून सोडले.
पोलीस तपासातील दिरंगाई ठरली घातक
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित लिओनोवने सर्वात आधी हरमल येथील एलिना कासथोनोवाची क्रूर हत्या केली होती. या पहिल्या खुनानंतर जर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असती आणि संशयिताचा माग काढला असता, तर पुढील खुनांची मालिका रोखता आली असती. मात्र, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे संशयिताला मोकळे रान मिळाले आणि त्याने मोरजी येथे एलीना वनीवा या युवतीची, तसेच कोरगाव येथे मृदुस्मिता सायकीया या महिलेची हत्या केली.