ईडीच्या छाप्यात २.८३ कोटी जप्त, मुख्य ड्रग्स तस्करला अटक

मुख्य ड्रग्ज तस्कर मधूपन शशिकलाला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
ईडीच्या छाप्यात २.८३ कोटी जप्त, मुख्य ड्रग्स तस्करला अटक

पणजी : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटविरोधात देशभरात मोठी मोहीम उघडली आहे. गोव्यासह महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर ८ राज्यांतील एकूण २६ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत गोव्यात २.८३ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, केरळ येथील सराईत ड्रग्ज तस्कर मधूपन सुरेश शशिकला याला अटक करण्यात आली आहे. मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने मधूपन याला सात दिवसाची ईडीची कोठडी दिली आहे.
ईडीच्या एका पथकाने दाभोलवाडो-शापोरा येथील ओमकार पालयेकर याच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान घरामध्ये २ कोटी ८३ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. ही रक्कम विशाल पालयेकर आणि त्याच्या कुटुंबीयांची असल्याचे सांगण्यात आले, मात्र या रकमेच्या वैधतेबाबत कोणतेही कायदेशीर दस्तऐवज सादर न करता आल्याने ईडीने ही सर्व रोकड जप्त केली आहे. याशिवाय, संशयिताशी संबंधित बँक खात्यांची माहिती मिळाली असून ती गोठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मुख्य तस्कर मधूपन शशिकला अटकेत
या मोहिमेदरम्यान ईडीच्या दुसऱ्या पथकाने शनिवारी मध्यरात्री आसगाव येथील एका खोलीवर छापा टाकून मधूपन सुरेश शशिकला (३१, रा. केरळ) याला ताब्यात घेतले. यापूर्वी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी गोवा पोलिसांनी त्याला एलएसडी ब्लॉट पेपर, गांजा आणि मॅझिक मशरूमसह अटक केली होती.
ड्रग्ज विक्रीतून मिळालेला पैसा आंतरराष्ट्रीय स्तरावर फिरवला जात असल्याचा (मनी लाँड्रिंग) संशय आल्याने ईडीने या प्रकरणाचा ताबा घेतला. चौकशीत सहकार्य करत नसल्याने मधूपनला अटक करण्यात आली. शनिवारी त्याला मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश ईर्शाद आगा यांनी त्याला ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली.
८ राज्यांमध्ये पसरले आहे जाळे
पोलीस तपासात मधूपन शशिकला याचे संबंध केवळ आंतरराज्य नव्हे, तर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांशी असल्याचे समोर आले आहे. या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी ईडीने एकाच वेळी गोवा, महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशातील ८ राज्यांतील एकूण २६ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.