साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

प्रस्तावित युनिटी मॉलचा वाद चिघळला, तर रशियनाच्या सिरियल किलिंगमुळे खळबळ

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
17th January, 09:29 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉलचा वाद अधिकच चिघळला आहे. विधानसभेवर काढलेला मोर्चा पोलिसांनी पणजीतच रोखल्यानंतर, संतप्त ग्रामस्थांनी मेरशी जंक्शनवर वाहतूक रोखून धरली होती. तुये हॉस्पिटल गोमेकॉला लिंक करण्यासाठी ग्रामस्थांची आंदोलन केले होते. याशिवाय विधानसभा अधिवेशन, घरफोडी, रशियन महिलांचा खून या घटना घडल्या. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार

गुन्हेगारासोबत जल्लाेष करणारा तुरुंग वाॅर्डन निलंबित

मुंगूल गँगवॉर प्रकरणातील सराईत गुन्हेगार अमोघ नाईक याची सशर्त जामिनावर सुटका झाली होती. कोलवाळ तुरुंगातून तो बाहेर पडल्यानंतर त्याच्या साथीदारांनी फटाके फोडून जल्लोष केला होता. त्यात तुरुंग वाॅर्डन लक्ष्मण पाडलोस्करही सहभागी झाले होते. याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले. याबाबतचा आदेश तुरुंग महानिरीक्षक केशव राम चौरासिया यांनी जारी केला आहे.


युनिटी मॉलचा वाद चिघळला

चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉलचा वाद अधिकच चिघळला आहे. आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी बोंदीर, सांताक्रूझ येथील आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. आमदार सरकारसोबत आहेत की चिंबलच्या जनतेसोबत, असा थेट सवाल करून ग्रामस्थांनी आमदारांच्या कार्यालयाला घेराव घातला.

तुयेवासीयांचे धरणे आंदोलन

तुये हॉस्पिटल गोमेकॉ हॉस्पिटलला लिंक करण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला. पहिल्या दिवशी, रविवारी हॉस्पिटल परिसरात साखळी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्थानिकांसह राज्यातील सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पर्रा येथे घरफोडीचा अयशस्वी प्रयत्न

पर्रा येथे शनिवारी रात्री घरफोडीचा प्रयत्न झाल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवार

नुवे येथे भरदिवसा घरफोडी; तीन लाखांचा ऐवज लुटला

नुवे येथील सॅन्ड्रा गुदिन्हो यांच्या घरात भरदिवसा चोरी करण्याचा प्रकार घडला. घरातील मंडळी चर्चमध्ये प्रार्थनेला गेल्याची संधी साधून चोरांनी सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल, असा ३.१० लाखांचा ऐवज लुटला. मायना कुडतरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावेळी विरोधक आक्रमक

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. बर्च क्लब दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्याच्या आणि त्यावरील चर्चेच्या मागणीवरून विरोधी आमदारांनी सभागृहात गदारोळ केला. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी सभापतींच्या समोरील हौद्यात धाव घेतली. अखेर मार्शलना बोलावून विरोधी आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.

कोलवाळ कारागृहात चरस, तंबाखू, २६ मोबाईल जप्त

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात कारागृह प्रशासनाने शनिवारी घेतलेल्या झाडाझडतीमध्ये २६ मोबाईल फोनसह ३० ग्रॅम चरस, ९ हजार रुपये किमतीचा तंबाखू आणि इतर प्रतिबंधित वस्तू जप्त केल्या. या प्रकरणी कारागृह प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून कोलवाळ पोलिसांनी अज्ञात कैद्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

मंगळवार

युनिटी मॉलवरून विरोधक आक्रमक

युनिटी मॉल प्रकल्पाला विरोध करताना विरोधी आमदारांनी हौद्यात धाव घेऊन प्रकल्पाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.


पंच शंकर नाईक यांना चोप देण्याचा जमावाकडून प्रयत्न

चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्पावरून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. प्रकल्पाचे समर्थन करणारे चिंबलचे पंच शंकर नाईक आणि आंदोलक यांच्यात झालेल्या संघर्षामुळे पंचायत परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त आंदोलकांनी पंच नाईक यांना घेराव घालून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.

हिवरे-सत्तरी येथील काजू बागायतीला आग

हिवरे येथील देवसू या डोंगरावर मंगळवारी सकाळी अचानकपणे काजू बागायतीला आग लागून सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. चार काजू उत्पादकांना याचा फटका बसला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास यश मिळवले. यामुळे सुमारे दोन लाख रुपयांची मालमत्ता वाचली आहे.

बुधवार

बारावीच्या विद्यार्थिनीची​ आत्महत्या

बारावीच्या परीक्षांमध्ये प्रगती चांगली नसल्याने एका उच्च माध्यमिक विद्यालयाने फेब्रुवारीला होणाऱ्या बारावीच्या परीक्षेस बसू दिले जाणार नाही, असे सांगितल्याने सासमोळे-बायणा येथील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली.

युनिटी मॉलचा बांधकाम परवाना रद्द

उत्तर गोवा प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने युनिटी मॉलचा बांधकाम परवाना रद्द करण्यासह बीडीओ आणि पंचायत उपसंचालकांचे आदेश नाकारले असले तरी प्रकल्पाविषयीचा तिढा कायम आहे. सरकार आणि प्रकल्पाला विरोध करणारे ग्रामस्थ स्वतःच्या भूमिकेवर ठाम आहेत.

सां जुझे दी अरीयाल परिसरात दोन भंगारअड्ड्यांवर कारवाई

सां जुझे दी अरीयाल पंचायत परिसरातील आणखी दोन बेकायदा भंगारअड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. दहा दिवसांपूर्वी दोन भंगारअड्ड्यांवर कारवाई करण्यात आली होती.

गुरुवार

आंदोलन सुरूच राहणार

चिंबल येथे प्रस्तावित असलेला ‘युनिटी मॉल’ प्रकल्प रद्द करण्याबाबत सरकारने विधानसभेत कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने चिंबल ग्रामस्थांनी आपले आंदोलन अधिक तीव्र केले आहे. गुरुवारी विधानसभेवर काढलेला मोर्चा पोलिसांनी पणजीतच रोखल्यानंतर, संतप्त ग्रामस्थांनी आता मेरशी जंक्शनवर ठाण मांडले असून वाहतूक रोखून धरली आहे.

पार्सेकरांच्या जमिनीतील ‘ऑटेलियो क्लब’ सील

हडफडे येथील बर्च क्लबमधील भीषण अग्निकांडानंतर प्रशासन सतर्क झाले असून, बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून हरमल-बामणभाटी येथील मिठागरात अनधिकृतरीत्या उभारलेला लाकडी पूल आणि योगा डेस्कमुळे ‘ऑटेलियो क्लब’ प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.

शुक्रवार

हरमल, मोरजीत दोन रशियन महिलांचा खून

हरमल व मोरजी येथे दोन ३७ वर्षीय रशियन पर्यटक महिलांचा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी आलेक्सेई लिओनोव (३७) या रशियन नागरिकाला अटक केली आहे. चौकशीवेळी संशयिताने एकूण पाच विदेशी महिलांचा खून केल्याचे सांगितल्याने बेपत्ता विदेशी महिलांची माहिती पोलीस मिळवत आहेत.


बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकरला अटक

बर्च क्लब अग्नितांडव प्रकरणी बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर याला चिखली-कोलवाळ येथे ताब्यात घेऊन हणजूण पोलिसांनी अटक केली. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ३० डिसेंबरपासून बागकर भूमिगत होता. शुक्रवारी बागकर चिखली कोलवाळ भागात असल्याची माहिती मिळताच पाळत ठेवून त्याला ताब्यात घेण्यात आले.

शनिवार

रघुवीर बागकरला पोलीस कोठडी

बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकरला ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बर्च क्लब दुर्घटना प्रकरणी हणजूण पोलिसांनी त्याला अटक केली होती. तर, क्लबचा सहमालक अजय गुप्ता याची न्यायालयीन कोठडी १४ दिवसांनी वाढवण्यात आली आहे.

लक्षवेधी

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या विरोधात शुक्रवारी पहाटे ६.३० पासून मोठी कारवाई सुरू केली. शिवोली येथील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणाचा तपास करताना तस्करीचे जाळे देशभर आणि विदेशांत पसरल्याचे उघड झाले. त्यानंतर ईडीने गोवा, महाराष्ट्र आणि दिल्लीसह ८ राज्यांतील एकूण २६ ठिकाणी एकाच वेळी छापे मारले. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दक्षिण गोव्यातील बाणावली आणि कोलवा किनारपट्टी भागात विनापरवाना चालणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. कारवाईत बाणावलीतील ‘युवर स्टोरी’ या रेस्टॉरंटसह कोलवातील ‘फिशलँड’, ‘गॅलेरिया’ व ‘एम बीच रिसॉर्ट’ ही रेस्टॉरंट्स आणि रिसॉर्ट्स सील करण्यात आली.

बर्च क्लबच्या बनावट आरोग्य दाखला प्रकरणी लुथरा बंधूंच्या अटकपूर्व जामीन अर्ज संबंधित दिल्लीतील पीडित जोशी कुटुंबीयांची हस्तक्षेप याचिका म्हापसा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळली. तसेच बर्च अग्नितांडव प्रकरणातील संशयित सरव्यवस्थापक राजीव कुमार मोडक याचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला.

कामरखाजन, म्हापसा येथे रोडरेजवरून संशयित कारचालकाने तक्रारदाराची वाट अडवून राष्ट्रीय महामार्ग रोखला आणि तक्रारदाराच्या कारचा आरसा व काच फोडली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी टोयोटा इनोव्हा कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा