दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : नातेसंबंधांना काळिमा फासणारी घटना

मडगाव : घोगळ येथील हार्डवेअर व्यावसायिक ललित उर्फ डुंगराम चौधरी याच्यावर २०२३ मध्ये प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी आरोपी भरत उर्फ भोमाराम चौधरी याला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व एक लाखांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास दोन वर्षांचा साधा कारावास सुनावला आहे.
ललित चौधरी हे विद्यानगर येथे भाड्याने हार्डवेअरचे दुकान चालवत होते. आरोपी भरत चौधरी हा केवळ ललित यांचा कर्मचारीच नव्हता, तर तो त्यांचा जवळचा नातेवाईकही होता. ७ जानेवारी २०२३ रोजी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून भरतने ललित यांच्यावर धारदार कोयत्याने सपासप वार केले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ललित यांना सोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.
घटनेची माहिती मिळताच फातोर्डा पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली होती. फरार भरत चौधरीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी सादर केलेले पुरावे, साक्षीदारांच्या जबान्या आणि वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे न्यायालयाने भरतला भारतीय दंड संहितेच्या खुनाचा प्रयत्न या कलमांतर्गत दोषी ठरवले.
याप्रकरणी शनिवारी झालेल्या अंतिम सुनावणीवेळी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने १० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा, एक लाखांचा दंड आणि दंड न भरल्यास आणखी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. दंड भरल्यास पीडित व्यक्तीला ५० हजारांची भरपाई देण्यास सांगितले आहे. आरोपीने आजपर्यंत भोगलेला कारवासाचा काळ मूळ शिक्षेतून कमी करण्यात येईल.
समाजात जरब बसवणारा निकाल
व्यावसायिक वादातून किंवा वैयक्तिक रागातून होणाऱ्या अशा हिंसक कृत्यांवर या निकालामुळे जरब बसेल, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. मालक आणि नातेवाईक असूनही केवळ रागाच्या भरात केलेल्या एका कृत्यामुळे आरोपीला आता आयुष्यातील मोठा काळ तुरुंगात घालवावा लागणार आहे.