महिलांनी राष्ट्र निर्मितीसाठी योगदान द्यावे !

डॉ. स्नेहा भागवत : डिचोलीत शिक्षा व्हिजन, भाजपतर्फे आयोजित महिला मेळाव्याला उत्तम प्रतिसाद


2 hours ago
महिलांनी राष्ट्र निर्मितीसाठी योगदान द्यावे !

‘गोड गोड बोला’ कार्यक्रमाला उपस्थित महिलांसोबत डॉ. स्नेहा भागवत, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, डॉ. दिनेश आमोणकर, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, विश्वास गावकर, पद्माकर मळीक व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : विकसित भारतासाठी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली नेत्रदीपक प्रगती करत आहे. पंतप्रधान मोदी ‘देश प्रथम’ या तत्त्वावर अविरतपणे प्रधान सेवकाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या पाठीशी सर्व महिलांनी लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वतीच्या रुपात खंबीरपणे उभे राहाणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. स्नेहा भागवत यांनी केले.
भाजप डिचोली आणि शिक्षा व्हिजन डिचोली आयोजित ‘गोड गोड बोला’ या हळदीकुंकू समारंभात डॉ. भागवत प्रमुख वक्त्या या नात्याने बोलत होत्या. महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन येथील हिराबाई झांटये स्मृति सभागृहात शनिवारी सायंकाळी करण्यात आले होते. व्यासपीठावर डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, सौ. भाग्यश्री शेट्ये, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, भाजप मंडळ अध्यक्ष डॉ. कौस्तुभ पाटणेकर, भाजप महिला मोर्चाप्रमुख शर्मिला पळ, जिल्हा पंचायत सदस्य पद्माकर मळीक, डॉ. दिनेश आमोणकर, उत्तर गोवा भाजप सरचिटणीस विश्वास गावकर, नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी, कार्यक्रम संयोजिका अॅड. अपर्णा आमोणकर, अॅड. शुभलक्ष्मी दीक्षित आदी उपस्थित होते. महिलांचे विविध प्रकारचे खेळ आणि स्पर्धा यातून हा कार्यक्रम बराच रंगला. डॉ. स्नेहा भागवत यांनी वैज्ञानिक दृष्टीतून हळदी-कुंकवाला लाभलेले महत्त्व विषद केले. महिलांनी संघटितपणे बलशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी योगदान देणे काळाची गरज आहे, असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
शुभदा प्रियोळकर यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून दिली. दीपप्रज्वलनाने समारंभाला प्रारंभ झाला. डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. सायली गर्दे हिने सूत्रसंचालन केले. अॅड. अपर्णा आमोणकर यांनी आभार मानले.
डिचोली मतदारसंघ हे आपले कुटुंब आहे. माता-भगिनींच्या सहकार्यामुळे मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पूर्ण सहकार्यामुळे विकासाची गंगा आणू शकलो. भविष्यातही अशीच साथ, सहकार्य मिळेल याची खात्री बाळगतो.
_ डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार, डिचोली

हेही वाचा