पर्वरी वेल्फेअर ग्रुपचा चिंबलवासीयांना जाहीर पाठिंबा

युनिटी मॉल : तोयार तलाव वाचवण्यासाठी आदिवासी समाजाचे उपोषण सुरूच

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
पर्वरी वेल्फेअर ग्रुपचा चिंबलवासीयांना जाहीर पाठिंबा

पणजी : चिंबल येथील तोयार तलावाच्या परिसरात प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ आणि ‘प्रशासन स्तंभ’ प्रकल्पांविरुद्ध स्थानिक आदिवासी समाजाचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. शनिवारी आंदोलनाच्या २१ व्या दिवशी पर्वरी वेल्फेअर ग्रुपच्या पथकाने विकास प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली उपोषणस्थळाला भेट देऊन आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना विकास प्रभुदेसाई यांनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, पर्वरी मतदारसंघातील रहिवासीही सध्या अशाच प्रकारच्या आव्हानांचा सामना करत आहेत. चिंबलच्या ग्रामस्थांनी तोयार तलाव आणि त्यातील जैवविविधता जपण्यासाठी जे पाऊल उचलले आहे, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. पर्यावरणपूरक नसलेल्या आणि विनाशकारी प्रकल्पांविरुद्ध लढण्यासाठी तुमचे प्रयत्न इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील.
तोयार तलाव क्षेत्राचे महत्त्व पटवून देण्यासाठी चिंबलमधील आदिवासी समुदायाने शनिवारी तलाव परिसरात आढळणाऱ्या विविध औषधी वनस्पतींचे नमुने गोळा केले. या दुर्मिळ औषधी वनस्पतींचे प्रदर्शन उपोषणस्थळी लावण्यात आले होते, ज्यातून या भागातील समृद्ध नैसर्गिक वारसा अधोरेखित करण्यात आला.
दरम्यान, चिंबल तोयार तलाव वाचवण्यासाठी गोव्याच्या कानाकोपऱ्यातून ज्या व्यक्तींनी आम्हाला पाठिंबा दिला आणि जो अजूनही मिळत आहे, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो, अशा भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या निर्णयाकडे लक्ष
१५ जानेवारी रोजी मध्यरात्री दिलेल्या आश्वासनानुसार, चिंबल ग्रामस्थ आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ हे प्रकल्प चिंबल गावातून रद्द करावेत किंवा इतरत्र हलवावेत, यावर येत्या सोमवारी मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.