मुख्यमंत्र्यांची घोषणा : पणजीत वन जैवविविधता महोत्सवाचे उद्घाटन

वन जैवविविधता महोत्सवाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वनमंत्री विश्वजीत राणे, वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष आमदार दिव्या राणे. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यातील हरित क्षेत्राचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्याच्या संवर्धनासाठी कडक कायदे केले जातील. आवश्यक सुधारणा प्रभावीपणे अंमलात आणल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. गोव्याची जैवविविधता जतन करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तिचा शाश्वत पद्धतीने अनुभव घेणेही आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कांपाल, पणजी येथील महावीर उद्यानात गोवा वन विकास महामंडळातर्फे आयोजित गोवा वन जैवविविधता महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्मंत्री श्रीपाद नाईक, वनमंत्री विश्वजीत राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष दिव्या राणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात गोव्याच्या घनदाट वनसंपदेविषयी माहिती देणारे फलक तसेच पारंपरिक वनपाककृतींवर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, वन जैवविविधता महोत्सवात जन, जंगल आणि जमीन या तीन घटकांवर भर देण्यात आला आहे. या तिन्ही घटकांचे संरक्षण करण्यासाठी वन मंत्रालय व वन खाते कार्यरत असून, गरज भासल्यास कायदे व नियमांमध्ये दुरुस्ती करण्यास सरकार मागे-पुढे पाहणार नाही. समुद्रकिनारी असलेल्या हरित क्षेत्राचे संवर्धनही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोव्याच्या वनपाककृतींवरील पुस्तकातून गोव्याची पारंपरिक खाद्यसंस्कृती, जुने स्वयंपाकाचे प्रकार व जीवनशैली यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या संकल्पनेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांनी आमदार दिव्या राणे यांचे विशेष कौतुक केले. गोवा सरकारतर्फे काजू, अन्न, मत्स्य, वाईन अशा विविध महोत्सवांचे आयोजन केले जाते. गोव्यातील नागरिकांनी या महोत्सवांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्यात इको पर्यटनालाही प्रोत्साहन देणार
राज्यात सध्या ६ अभयारण्ये आणि १ राष्ट्रीय उद्यान आहे. ही स्थळे पाहणे व त्यांचा अनुभव घेणे ही काळाची गरज आहे. देशातील सर्वाधिक समृद्ध जैवविविधतेपैकी एक गोव्याच्या पश्चिम घाटात आढळते. या जैवविविधतेचे संरक्षण करतानाच तिचा आनंद घेण्यासाठी पुनरुज्जीवन पर्यटन संकल्पनेखाली इको-पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाईल, ज्यामुळे राज्यात येणारे पर्यटक जंगलांनाही भेट देतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.