मुलांच्या भविष्याला सरकारचे प्राधान्य : मुख्यमंत्री

बुलबुल बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता


2 hours ago
मुलांच्या भविष्याला सरकारचे प्राधान्य : मुख्यमंत्री

बुलबुल बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत मंत्री दिगंबर कामत व आमदार उल्हास तुयेकर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : गोवा हे आगामी काही काळात देशातील क्रिएटिव्ह कॅपिटल होईल. स्वयंपूर्ण गोवा करतानाच राज्य सरकार हॅप्पीनेस इंडेक्स वाढवण्यासाठीही काम करत आहे. पुढील पिढीची सर्जनशीलता वाढवणारे कार्यक्रम करण्यावर भर दिला जात आहे. मुलांच्या भविष्याला सरकार प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मडगाव येथील रवींद्र भवन येथे माहिती व प्रसिद्धी खात्याकडून आयोजित बुलबुल बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तिसर्‍या पर्वाची सांगता शनिवारी झाली. व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, सिद्धेश सामंत, महोत्सवाचे संचालक बिपीन खेडेकर, सिद्धेश नाईक उपस्थित होते. अनुपम खेर दिग्दर्शित ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाने महोत्सवाची सांगता झाली. समारोपावेळी दिव्या नाईक, राजेश मडगावकर, नॉर्मन यांचा ‘बँड ऑफ फ्युजन’ कार्यक्रमही झाला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, यापूर्वी केवळ चित्रपट क्षेत्राशी निगडित लोकांसाठीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत होते. मात्र बुलबुल बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘जेन झी’साठी आयोजित केला आहे. मुलांतील कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या संकल्पना वृद्धिंगत व्हाव्यात यासाठी हा महोत्सव आहे. मुलांची संकल्पना, विचार करण्याची क्षमता व कल्पनेतील विश्व हे मोठ्या व्यक्तीच्या जगापेक्षा वेगळ्या असतात. मुलांच्या कल्पनाशक्ती, निर्मिती क्षमताला वाव देण्यासाठी बुलबुल चित्रपट महोत्सव आहे. त्यामुळे हा महोत्सव असाच सुरू राहील.
मंत्री दिगंबर कामत म्हणाले, ‘बुलबुल’ महोत्सवात मुलांच्या आवडीच्या कार्यक्रमांवर भर असतो. संस्कारक्षम चित्रपट दाखवले जातात. कल्पनांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. ‘बुलबुल’ महोत्सव लवकरच देशातील अग्रणी महोत्सव म्हणून नावारुपास येईल.
शॉर्टफिल्ममध्ये द थिफ विजेता
‘बुलबुल’ महोत्सवात शॉर्ट फिल्म प्रकारात उत्कृष्ट चित्रपटाचे गोल्डन बुलबल चषक व १ लाख रुपयांचे बक्षीस ‘द थिफ’ या डेन्मार्क अँड ग्रीनलँडमधील शॉर्टफिल्मला प्राप्त झाला. उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सिल्व्हर बुलबुल व ५० हजारांचे बक्षीस कॅनडाच्या ‘द गर्ल हू क्राईड पर्ल’ याला मिळाला. विशेष परीक्षक पुरस्कार कोेलंबियाच्या ‘द ग्रेट फिट’ला मिळाला. विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून यूकेच्या ‘हॅप्पी स्नॅप’ला गौरवण्यात आले.
फिचर फिल्म प्रकारात निऑन ड्रिमिंग अव्वल
फिचर फिल्म प्रकारात कॅनडाची ‘निऑन ड्रिमिंग’ या चित्रपटाला प्रथम क्रमांकाचे ३ लाख व गोल्डन बुलबुल चषक देण्यात आला. उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून १ लाख व सिल्व्हर बुलबुल चषक नेदरलँड व बेल्जियमच्या ‘लँपी’ चित्रपटाला मिळाला. उत्कृष्ट बालकलाकाराचे बक्षीस भारतातील ‘बर्ड ऑफ डिफरन्ट फिदर’च्या जयश्री हिला मिळाला. विशेष परीक्षक पुरस्कार भारताच्या ‘डुपकी’ चित्रपटाला मिळाला. विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून ‘पासिंग ड्रिम्स’ या कलाकृतीला गौरवण्यात आले.