ब्रह्मकरमळी येथे घराला भीषण आग; हरवळकर कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
just now
ब्रह्मकरमळी येथे घराला भीषण आग; हरवळकर कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान

वाळपई: सत्तरी तालुक्यातील ब्रह्मकरमळी येथे शनिवारी रात्री उशिरा गुणवंती हरवळकर यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घराचे छप्पर आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, कुटुंबाला सुमारे दोन लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेत घटनास्थळी धाव घेतल्यामुळे लाखो रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अचानक घराला आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी ती विझवण्याचा शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने स्थानिकांचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर वाळपई अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत घराच्या छप्परासह दर्शनी भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच घरातील टीव्ही, फ्रीज आणि इतर घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांची पूर्णपणे राख झाली आहे.

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, तरीही प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. घरमालक गुणवंती हरवळकर यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा रितसर पंचनामा केला असून, नुकसानीचा सविस्तर अहवाल संबंधित सरकारी विभागाला पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे हरवळकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.