एनएमसीच्या निरीक्षणादरम्यान बाहेरून भाड्याचे डॉक्टर आणि बनावट रुग्ण पैसे देऊन आणल्याचे 'ईडी'च्या तपासात स्पष्ट

नवी दिल्ली: फरीदाबाद येथील अल फलाह युनिव्हर्सिटी सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर असून या संस्थेबाबत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) धक्कादायक खुलासे केले आहेत. दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणाच्या चौकशीदरम्यान या युनिव्हर्सिटीचे धागेदोरे हाती लागले असून, संस्थेने राष्ट्रीय चिकित्सा आयोगाची (NMC) दिशाभूल करण्यासाठी मोठी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
आयोगाच्या पथकाने जेव्हा युनिव्हर्सिटीचे निरीक्षण केले, तेव्हा त्यापूर्वीच भाड्याने डॉक्टर बोलावण्यात आले आणि रुग्णालयात गर्दी दाखवण्यासाठी दलालांमार्फत पैसे देऊन खोटे रुग्ण आणण्यात आले, असा खळबळजनक दावा 'ईडी'ने केला आहे.
तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, युनिव्हर्सिटीकडे आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव होता. केवळ कागदोपत्री सर्वकाही सुरळीत दाखवण्यासाठी बाहेरून डॉक्टर मागवून त्यांना नियमित कर्मचारी म्हणून सादर करण्यात आले. इतकेच नव्हे तर, 'एनएमसी'च्या पथकाची दिशाभूल करण्यासाठी तातडीने उपचाराच्या सोयी उपलब्ध असल्याचे नाटक रचले गेले. व्हॉट्सॲप चॅट आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे 'ईडी'ने हे स्पष्ट केले आहे की, हे डॉक्टर प्रत्यक्षात तिथे कार्यरत नव्हते, तर केवळ दोन दिवस किंवा काही आठवड्यांपुरते त्यांना हजर दाखवण्यात आले होते.
या फसवणुकीद्वारे युनिव्हर्सिटीने हरियाणा सरकारकडून विविध कोर्सेस सुरू करण्याची परवानगी मिळवली आणि विद्यार्थ्यांकडून तब्बल ४९३ कोटी रुपयांची अवैध कमाई केली.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून 'ईडी'ने अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टशी संबंधित नऊ बनावट कंपन्यांचीही चौकशी सुरू केली आहे. युनिव्हर्सिटीने 'नॅक' (NAAC) आणि 'युजीसी'च्या (UGC) मान्यतेबाबतही चुकीची माहिती दिल्याचे तपासात आढळले आहे. या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली असून, शुक्रवारी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
तसेच, या कारवाईत संस्थेची सुमारे १३९.९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळून आणि तपास यंत्रणांची दिशाभूल करून कमावलेला हा काळा पैसा आता जप्तीच्या कारवाईच्या कचाट्यात सापडला आहे.