
इंफाळ: मणिपूरमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या भीषण वांशिक हिंसाचाराच्या काळात सामूहिक बलात्काराचा बळी ठरलेल्या एका २० वर्षीय कुकी तरुणीचा अखेर मृत्यू झाला आहे. १० जानेवारी २०२६ रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून ही तरुणी केवळ गंभीर शारीरिक जखमांशीच नव्हे, तर त्या घटनेने बसलेल्या खोल मानसिक धक्क्याशी आणि न्यायाच्या आशेवर झुंज देत होती. आपल्या मुलीला जिवंत असताना न्याय मिळू शकला नाही, ही खंत तिच्या कुटुंबीयांनी अत्यंत जड अंतःकरणाने व्यक्त केली आहे.

मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार उसळला होता. याच काळात इंफाळमध्ये या तरुणीचे अपहरण करून चार सशस्त्र नराधमांनी तिला डोंगराळ भागात नेले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केले. या नृशंस घटनेनंतर ती गंभीर जखमी झाली होती. कशीबशी आपली सुटका करून घेतल्यानंतर तिने शेजारील नागालँडमधील कोहिमा येथे उपचार घेतले. मात्र, त्या रात्रीच्या भयावह आठवणींनी तिचा पिच्छा सोडला नाही. एकेकाळी हसमुख आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करणारी ही मुलगी घटनेनंतर पूर्णपणे खचून गेली होती. ती एका खोलीत बंदिस्त झाली आणि तिचे लोकांशी बोलणेही बंद झाले होते.

पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तिला सतत भीतीदायक स्वप्ने पडत असत आणि ती असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता आणि प्रकृती सतत खालावत गेली. स्वदेशी जनजातीय नेता मंचने (ITLF) या घटनेचा निषेध व्यक्त करत पीडितेच्या स्मरणार्थ मेणबत्ती मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मणिपूरमधील या जातीय संघर्षात आतापर्यंत २६० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून, हजारो लोक विस्थापित झाले आहेत.
