२०२७ च्या विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा : दामू नाईक

प्रदेशाध्यक्षपदी निवडीच्या वर्षपूर्तीनिमित्त मडगावात कार्यक्रम

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
just now
२०२७ च्या विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा : दामू नाईक

मडगाव : आगामी विधानसभा निवडणुका २०२७ मध्ये होणार असून आपल्याकडे आता केवळ बारा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मागील निवडणुका १४ फेब्रुवारी रोजी झाल्या होत्या आणि मार्चमध्ये निकाल लागले होते. त्यामुळे आता वेळ वाया न घालवता विजयाचा रथ पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले. भाजपच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात, प्रदेशाध्यक्षपदी एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दामू नाईक यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दक्षिण गोवा जिल्हा समितीचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, शर्मद पै रायतूरकर, श्वेता लोटलीकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना दामू नाईक म्हणाले की, वर्षपूर्ती साजरी करण्याचा कोणताही प्रघात पक्षात नाही, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हा छोटेखानी समारंभ साजरा करण्यात आला आहे. भाजपच्या केंद्रीय समितीकडून राज्यात अनेक उपक्रम राबवले जातात आणि कार्यकर्ते तेवढ्याच जोमाने ते तळागाळापर्यंत पोहोचवतात. कार्यकर्त्यांच्या याच मेहनतीचे फळ निवडणुकीत मिळते. भाजप सदैव मतदारांच्या विकासासाठी काम करतो, मात्र काही पक्ष केवळ निवडणुकीपुरते जनतेच्या दारात जातात. दुर्दैवाने काही मतदार त्यांच्या भूलथापांना बळी पडतात.

भाजप सर्व आव्हाने परतून लावत देशभर यशस्वी वाटचाल करत आहे. काश्मीर, बिहार, दिल्ली, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये पक्षाने विजय मिळवला आहे. गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकांच्या वेळी प्रतिकूल परिस्थिती असतानाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून पक्षाला चांगले यश मिळाले, असेही नाईक यांनी नमूद केले.

मतभेद असतील पण मनभेद नाहीत राज्यात ५१ टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते आणि आपण ४६ टक्क्यांपर्यंत पोहोचलो आहोत. यामध्ये मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. पक्षात काही विषयांवर मतभेद असू शकतात, पण मनभेद कुठेही नाहीत. आगामी काळातील आव्हानांचा सामना करत आपल्याला पुढे जायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

उमेदवारांवरील नाराजी आणि मतभेदांचा फटका आगामी काळात नगरपालिका निवडणुका आणि फोंडा पोटनिवडणूक होणार आहे. फोंडा पोटनिवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अंतर्गत मतभेद बाजूला ठेवण्याची गरज आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत अधिक जोर लावला असता, तर आपण आणखी चार जागा जिंकू शकलो असतो. काही ठिकाणी उमेदवारांवरील नाराजी आणि कार्यकर्त्यांमधील मतभेदांमुळे विरोधकांना मते मिळाली. मात्र, विरोधकांनी त्याचा गाजावाजा करू नये. यापुढे सर्वांना एकत्र घेऊन काम केल्यास भारताला 'विश्वगुरू' बनवण्याचे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.