
वास्को : येथील रेल्वे स्थानकावर शनिवार, दि. १७ रोजी रात्री गस्त घालत असताना हवालदार संतोष गोगळे (४७) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. याप्रकरणी वास्को रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गोगळे हे वास्को रेल्वे पोलीस स्थानकावर कार्यरत होते. एका पोलीस शिपायासह ते शनिवारी रात्री सव्वा आठच्या दरम्यान वास्को रेल्वे स्थानकावर गस्त घालीत होते. गस्त घालीत असताना ते अचानक खाली कोसळले. त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने, त्यांना १०८ मधून उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तथापी तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संतोष गोगळे यांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर रविवारी सकाळी अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच त्यांचे सहकारी, नागरिक उपस्थित होते.