शहरी भागातील जमिनीच्या सर्वेक्षणाला दवर्ली-दिकरपाल ग्रामसभेत विरोध

पंचायतीचे हक्क काढून घेण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
शहरी भागातील जमिनीच्या सर्वेक्षणाला दवर्ली-दिकरपाल ग्रामसभेत विरोध

दवर्ली दिकरपाल पंचायत क्षेत्रातील भू सर्वेक्षणाला विरोध करताना नागरिक.

मडगाव : शहरी भागातील जमीन सर्वेक्षणात दवर्ली दिकरपाल (Davarli Dikarpal) पंचायतीचा समावेश केला आहे. दहा वर्षांपूर्वीही असा प्रयत्न झाला होता त्याला लोकांनी विरोध दर्शवला व आताही पंचायत क्षेत्रातील भू सर्वेक्षणाला दवर्ली दिकरपाल नागरिकांनी ग्रामसभेत विरोध दर्शवला.
दवर्ली दिकरपाल पंचायतीची विशेष ग्रामसभा (Special Gram Sabha) पंचायतीच्या सभागृहात रविवारी पार पडली. सरपंच मिनीन कुलासो यांनी सांगितले की, सेटलमेंट अँड लँड रेकॉर्ड संचालनालयाकडून नोटीस जारी करण्यात आली होती तसेच पंचायतीला त्याची एक प्रत पाठवण्यात आली आहे. त्यानुसार मडगाव शहरासोबत आके, दवर्ली, नावेली, नुवे, सुरावली, राय या भागांचाही समावेश जमिनींच्या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. यात घरे व इतर मालमत्तेची मोजणी केली जाणार आहे. याबाबत नागरिकांना कळवण्यासाठी ही विशेष ग्रामसभा आयोजित केल्याचे ते म्हणाले.
यावेळी ग्रामस्थ अँड्र्यू यांनी हे सर्वेक्षण झाल्यास भविष्यात पंचायतीचे अस्तित्व संपून गावाचा समावेश पालिकेत होऊ शकतो. यामुळे नागरिकांना किरकोळ कामांसाठीही पालिकेचे उंबरठे झिजवावे लागतील. एफएसआय वाढवण्यात आल्यास गावातील उरली-सुरली शेती संपुष्टात येईल आणि गावाचे स्वरूप बदलून जाईल. सरकार कायद्यात बदल करून पंचायतींचे अधिकार काढून घेत असून, केवळ सचिवांनाच अधिकार दिले जात असल्याबद्दलही यावेळी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, या विशेष ग्रामसभेला ५ पंच सदस्य अनुपस्थित राहिले. यावरही ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला. गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न असताना पंचांची अनुपस्थिती योग्य नाही. पुढील ग्रामसभेला उपस्थित राहण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
८ फेब्रुवारीला पुन्हा विशेष ग्रामसभा
या सर्वेक्षणाला विरोध करणारा ठराव सभेने एकमताने मंजूर केला. मात्र, तांत्रिक कारणास्तव ही प्रक्रिया पुन्हा राबवली जाणार आहे. सरपंच मिनीन कुलासो यांनी सांगितले की, या ग्रामसभेपूर्वी पंच सदस्यांची बैठक झाली नव्हती. त्यामुळे २४ जानेवारी रोजी पंच सदस्यांची अधिकृत बैठक होईल. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा विशेष ग्रामसभा आयोजित करून भू-सर्वेक्षण विरोधाचा अंतिम ठराव संमत केला जाईल.

हेही वाचा