आमदार गोविंद गावडे : माशेल येथे मराठी राजभाषा साहित्य संमेलन

मराठी राजभाषा साहित्य संमेलनाचे समई प्रज्वलित करून उद्घाटन करताना आमदार गोविंद. गावडे. सोबत चंद्रकात गावस, अॅड. विनायक नार्वेकर, प्रदीप घाडी आमोणकर, डॉ. मधु घोडकिरेकर व इतर. (रामानंद तारी)
माशेल : मराठी भाषेची गळचेपी आम्ही आमच्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देऊन करीत आहे. त्यात बदल व्हायला पाहिजे. मराठी ही कुठल्या धर्माची, किंवा जातीची नाही. राजाश्रय नसताना तुम्ही लोकाश्रयावर हे तिसरे मराठी राजभाषा साहित्य संमेलन करता यावरून तुमचा स्वाभिमान कळतो. यासाठी भावी पिढी ताठ कण्याची होणार. तुम्ही कितीही भाषा शिका मात्र प्रेम मराठी वरच करा, असे आवाहन प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी केले.
माशेल येथील नोनु व्हिलेजमध्ये गोमंतक मराठी अकादमी व मराठी असे आमुची मायबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या मराठी राजभाषा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक चंद्रकांत गावस, स्वागताध्यक्ष अॅड. विनायक नार्वेकर, नोनु नाईक, डॉ. मधु घोरकिरेकर तसेच गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, प्रकाश भगत आदी उपस्थित होते.
आमदार गावडे यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांच्या कार्याचे स्मरण केले. ते म्हणाले, माझ्या मतदारसंघात बंद पडणाऱ्या मराठी शाळा मी पुन्हा सुरू करून त्यांची पटसंख्या वाढवली आहे. कला आणि संस्कृती मंत्री असताना मी नेहमीच मराठी कार्यक्रमांना ५० टक्के आर्थिक सहाय्य देऊन पाठबळ दिले आहे.
स्वागताध्यक्ष अॅड. विनायक नार्वेकर यांनी चिंता व्यक्त केली की, पूर्वी सासष्टी सोडून सर्वत्र व्यवहार मराठीत व्हायचा, मात्र आता इंग्रजीचा प्रभाव वाढला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक गावात मराठी कृती समिती स्थापन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मराठीचे अभिमानी डॉ. काशिनाथ जल्मी यांचे नाव बसस्थानक किंवा बाजाराला द्यावे, अशी मागणी प्रमुख कार्यवाह डॉ. मधू घोडकिरेकर यांनी केली. यावेळी चंद्रकांत गावस यांच्या हस्ते बाळकृष्ण धारगळकर यांच्या ‘चौरंगी’ व वनिता फडते यांच्या ‘अंतरातील शब्दस्वर’ या कवितासंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले.
मराठी संपली, तर कोकणी संपेल!
मराठी ही गोव्याच्या आध्यात्मिक वारशाची मुख्य भाषा असून, सन १२९९ पासूनचे ताम्रपट याचे पुरावे आहेत. मराठी आणि कोकणी या एकमेकींना पूरक आहेत; जर मराठी संपली तर कोकणीचे अस्तित्वही धोक्यात येईल, हे सत्य आता कोकणीप्रेमींनाही उमजले आहे. त्यामुळेच, पटसंख्येअभावी बंद पडणाऱ्या मराठी शाळा वाचवण्यासाठी गोव्यातील सर्व मराठी संस्थांनी तातडीने एकत्र येऊन उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे, असे संमेलनाध्यक्ष चंद्रकांत गावस म्हणाले.