मुख्यमंत्री डॉ. सावंत : फोंडा मतदारसंघात नवमतदार संमेलन

फोंडा : भारतातल्या काही पक्षांनी वेळोवेळी हात दाखवून फक्त राजकारण करण्याचे काम केले. आमच्या सरकारने मात्र त्या हाताला काम देण्याचे कार्य करून दाखवले. युवकांनो, देश तुम्हाला साद घालत आहे. भारतीय जनता पक्षात सामील व्हा. कारण येथे देश प्रथम ही भावना आम्ही युवकांमध्ये जागृत करत आहोत, असे आवाहन मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, फोंडा मतदारसंघाचे नव मतदार संमेलन रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मनोहर आडपईकर, नगराध्यक्ष व भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार केळकर, मंडळ अध्यक्ष हरीश नाईक, नगरसेवक रितेश नाईक, रॉय नाईक, विश्वनाथ दळवी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, देशातील प्रत्येक युवक हा चारित्र्यसंपन्न असावा हे भारतीय जनता पक्षातील प्रत्येकाचे स्वप्न आहे. तुमचे चरित्र व चारित्र्य हे तुम्हीच ठरवणार आहात. त्यासाठी तुमच्यावर योग्य संस्कार व्हायला हवेत. तुमच्या मधला आत्मविश्वास दिवसेंदिवस सुदृढ करण्याचा प्रयत्न करा. अशाने तुमच्या मधील नेतृत्वगुणांना पैलू पडतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशाच्या प्रगतीची माहिती मिळते, हा कार्यक्रम युवकांनी आवर्जून पहावा. ‘मन की बात’ मधून तुम्हाला मिळणारा अनुभव इतरांना देखील सांगा, असा सल्ला त्यांनी दिला. माझ्या गोव्यातील प्रत्येक युवक हा आपापल्या क्षेत्रातील लीडर बनला पाहिजे. त्यासाठी तुमच्या मधील बांधिलकी व वचनबद्धतेला प्राधान्य द्या. या गोष्टीचा अवलंब केल्यास तुमच्या करिअरला त्याचा निश्चितच फायदा होईल. तुम्ही तुमचे करिअर स्वतः घडवू शकाल.
गोव्यातील प्रत्येक युवक हा रोजगार क्षम बनला पाहिजे. त्यासाठी सरकारच्या माध्यमातून आम्ही अनेक योजना निर्माण केलेल्या आहेत. सरकारी नोकरीची स्वप्ने जास्त पाहू नका. कौशल्य पूर्वक कार्यक्रमांचा फायदा घेत नोकरी घेणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बनण्याचा प्रयत्न करा. हे संमेलन केवळ राजकारणासाठी नसून तुमच्या भावी जीवनाला नवी कलाटणी देण्यासाठी आयोजित केले आहे. - डॉ. प्रमोद सावंत
राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला : दामू नाईक
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, युवकांनी राजकारणाकडे नकारात्मकतेने पाहू नये. नवमतदारांच्या हातातील ‘बॅलेट’ची ताकद नवभारत घडवण्यासाठी वापरावी. मी भाजपचा सदस्य आहे, याचा अभिमान बाळगा आणि पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
भाजपात ५०० युवकांचा प्रवेश
या संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे फोंडा मतदारसंघातील तब्बल ५०० नवमतदारांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या या तरुणांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत करून त्यांचे कौतुक केले.