‘माझे घर’ योजनेसाठी आतापर्यंत १३०० अर्ज

मामलेदार, उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज उपलब्ध; योजनेची मुदत १ एप्रिलपर्यंत


18th January, 11:35 pm
‘माझे घर’ योजनेसाठी आतापर्यंत १३०० अर्ज

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मूळ गोमंतकीयांच्या नावावर घरे व्हावीत, या हेतूने सुरू केलेली ‘माझे घर’ योजना कार्यान्वित होऊन तीन महिने झाले. या काळात हजारो अर्जांचे वितरण झाले आहे. मात्र आतापर्यंत सरकारकडे १,२९५ अर्ज प्राप्त झाले आहेत, या योजनेच्या जाहिराती, कार्यक्रम यावर १ कोटी ११ लाख रुपयांचा खर्च झाला आहे, अशी माहिती विधानसभेतील प्रश्नोत्तरातून मिळाली आहे.
सरकारी जमिनीतील, कोमुनिदाद जमिनीतील, १९७२ पूर्वीची सर्वेवर लागलेली बांधकामे/घरे, वीस कलमी योजनेखालील, तसेच खासगी जमिनीतील अनधिकृत घरे/बांधकामे नियमित (अधिकृत) करण्यासाठी ‘माझे घर’ योजना होती. या योजनेचे मामलेदार व उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. या योजनेची मुदत १ एप्रिल २०२६ पर्यंत आहे. पुढील अडीच महिन्यांत किती अर्ज येतात, यावर या योजनेचे यश अवलंबून आहे.
कोमुनिदाद जमिनीतील घरांसाठी फक्त ४ अर्ज
कोमुनिदाद जमिनीतील घरे अधिकृत करण्यासाठी फक्त ४ अर्ज आले आहेत. उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील ३, तर डिचोली तालुक्यातील १ अर्ज आला आहे. बार्देशमधील सेरूला, अस्नोडा आणि शिरसई कोमुनिदादीतील बांधकाम/घराविषयी प्रत्येकी एक, तर डिचोलीतील नावेली कोमुनिदादीतील बांधकाम/घराविषयीचा एक अर्ज आहे.
‘रुका’खाली उत्तरेतून अधिक अर्ज
खासगी जमिनीतील अनधिकृत घरे/बांधकामे अधिकृत करण्यासाठी ‘रुका’ कायदा आहे. यापूर्वी नामंजूर झालेल्या अर्जदारांना अर्ज करण्याची मुभा देऊन आधीच्या कायद्यात सरकारने दुरुस्ती केली. या कायद्याखाली २९८ (उत्तर गोवा १५९, दक्षिण गोवा ७१, कुशावती ६८) अर्ज आले आहेत. उत्तर गोव्यातील बार्देश ३४, पेडणे ५२, तिसवाडी ३३ आणि पेडण्यातून ५२ अर्ज आले. दक्षिण गोव्यातील मुरगाव ८, फोंडा २, सासष्टीतून ६१ अर्ज आले. कुशावतीतून ६८ अर्ज आले. यामध्ये सांगे ६, काणकोण ७ आणि केपेतून ५५ अर्ज आले आहेत.
सरकारी जमिनीतील घरांसाठी ३७ अर्ज
सरकारी जमिनीतील अनधिकृत घरे अधिकृत करण्यासाठी सरकारने भू महसूल संहितेत दुरुस्ती केली. ही घरे नियमित करण्यासाठी ३७ अर्ज आले आहेत. तिसवाडी ५, डिचोली २२, सत्तरी ४, मुरगाव ४, सांगेतून २ अर्ज आले आहेत.
१९७२ पूर्वीच्या बांधकामांच्या अर्जांची स्थिती
१९७२ पूर्वीची घरे नियमित करण्यासाठी ५२७ अर्ज आले आहेत. उत्तर गोव्यात ३२४, दक्षिण गोव्यात १३१, तर कुशावती जिल्ह्यातून ७२ अर्ज आले आहेत. बार्देश ४५, पेडणे १३७, तिसवाडी ५२, सत्तरी ३२, डिचोली ५८, सासष्टी ७१, मुरगाव १२, फोंडा ४८, सांगे १७, धारबांदोडा ६, काणकोण १३ आणि केपे तालुक्यातून ३६ अर्ज आले आहेत.
वीस कलमी कार्यक्रमाअंतर्गत ४२७ अर्ज
वीस कलमी कार्यक्रमाअंतर्गत बांधलेली घरे नियमित करण्यासाठी ४२९ अर्ज आले आहेत. बार्देश ८, पेडणे ५, तिसवाडी ८६, डिचोली ९, सासष्टी ५०, मुरगाव १५, फोंडा १४५, सांगे ३३, केपे ३४, काणकोण २४, तर धारबांदोडा तालुक्यातून १४ अर्ज आले आहेत.