आठ राज्यांत छापेमारी : चरससह ३ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त

ईडीने जप्त केलेली रोख रक्कम.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने आंतरराष्ट्रीय ड्रग्जरॅकेट विरोधात गोव्यासह महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर ८ राज्यांतील एकूण २६ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली होती. त्यात ३ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह चरस जप्त करण्यात आला होता. केरळ येथील सराईत ड्रग्जतस्कर मधूपन सुरेश शशिकला याच्यासह दिल्लीतून आणखी एका तस्कराला अटक करण्यात आली आहे.
गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) १४ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री वाडी शिवोली येथील बे व्ह्यू इमारतीतील फ्लॅटवर छापा टाकला होता. त्यावेळी मधूपन सुरेश शशिकला (रा. थिरूवंतपुरस, केरळ) याला अटक केली होती. त्याच्याकडून १ कोटी १ लाख ६५ हजार २०० रुपये किमतीचे २६.३९ ग्रॅम वजनाचे १,८२५ एलएसडी ब्लॉट पेपर, १.०७ ग्रॅमचे ४३ एलएसडी तुकडे, १०२ ग्रॅम उच्च दर्जाचा गांजा आणि ७८.८० ग्रॅम सायलोसायबिन मॅझिक मशरूम ड्रग्ज जप्त केले होते. याची दखल घेऊन ईडीने प्राथमिक चौकशी सुरू केली होती. त्यात मनी लाँड्रिंगचा संशय आला. तसेच संशयित मधूपनचे आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य ड्रग्जतस्करांशी संबंध दिसून आले. ईडीने अधिक चौकशी करून शुक्रवारी गोव्यासह, महाराष्ट्र आणि दिल्लीसह ८ राज्यात एकूण २६ ठिकाणी एकाच वेळी छापे मारले.
गोव्यात ईडीने दाभोलवाडा-शापोरा येथील ओंकार पालयेकर याच्या वडिलाेपर्जित घरावर छापा टाकला. ईडीला घरात २ कोटी ८३ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम मिळाली. ही रक्कम विशाल पालयेकर आणि त्याच्या कुटुंबीयांची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ती जप्त केली. दुसऱ्या पथकाने आसगाव येथील एका खोलीवर छापा टाकून मधूपन सुरेश शशिकला (३१, रा. केरळ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चरस जप्त करण्यात आला. हणजूण पोलिसांना माहिती देऊन जप्त चरस पुढील कारवाईसाठी त्यांच्याकडे देण्यात आला. दिल्लीतील पथकाने एका उच्च शिक्षित व्यक्तीकडून किरकोळ प्रमाणात अमलीपदार्थ जप्त केले. पुढील कारवाईसाठी त्याला अटक केली. अमलीपदार्थ दिल्ली पोलिसांकडे सुपूर्द केले.
जप्त कागदपत्रांची कसून तपासणी
ईडीने देशभरात केलेल्या या छापेमारीत जप्त केलेली कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे यांची कसून तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे.