पर्यटन, सेकंड होमच्या पसंतीमुळे गोव्यात जमिनीच्या किंमतींची कोटींच्या कोटी उड्डाणे


1 hours ago
पर्यटन, सेकंड होमच्या पसंतीमुळे गोव्यात जमिनीच्या  किंमतींची कोटींच्या कोटी उड्डाणे

पणजी : पर्यटन (Tourism), सेकंड होम व यात पुन्हा जम‌िनीच (Land) शिल्लक नसल्याने राज्यात (Goa) जमिनीच्या किमतीही अपेक्षेपेक्षाही अधिक प्रमाणात वाढत आहेत. मागणीनुसार जमीन व फ्लॅटचे (Flat) दर ठरत असल्याने; किमतीबाबत भाकीत वा सरासरी दर सांगणेही अवघड होत असल्याची माहिती रिअल इस्टेट व्यावसायिक तथा बिल्डरांकडून मिळाली. 

बार्देश तालुक्यातील (Bardez Taluka) मयडे येथे एक अलिशान व्हिला १०५ कोटींना सूचीबद्ध केला. यावरून गोव्यातील जमिनी तसेच फ्लॅट, घरांचे दर किती वाढलेले आहेत, याचा अंदाज येतो. याबाबत अधिक माहिती देताना बांधकाम व्यावसायिक देश प्रभुदेसाई म्हणाले, दोनापावल (पणजी) व आसपासच्या भागात जमिनीचा दर १ लाख ५० हजार चौ. मी मीटर आहे. यावरून फ्लॅटच्या दराचा अंदाज करता येतो. मडगावात जमिनीचा दर सरासरी ६५ हजार चौ.मीटर आहे. पणजी पेक्षा मडगावचे  दर कमी आहेत. मात्र, किनारपट्टी भागात किंमती मडगाव पेक्षा जास्त आहेत. एखादे स्थळ वा जमीन आवडली तर सेलेब्रीटी, धनाढ्य व्यक्ती कितीही किंमत देण्यास तयार असतात. यामुळे किंमत आणखी वाढते. मयडे येथील व्हिलाचा दर १०५ कोटींना सूचीबद्ध करण्यामागे हाच हेतू आहे.

शहरी तसेच किनारपट्टी भागाबरोबर नजीकच्या परिसरात वनराई, तळे असेल तर त्या जमिनीलाही चांगला भाव येतो. सेकंड होमसाठी जमीन खरेदी करणारे बऱ्याचदा गर्दी पेक्षा एकांतवासाला पसंती देतात. यामुळे आता काणकोण, पेडणे, सत्तरी या सारख्या ग्रामीण भागातील जमिनींच्या किमतीही वाढण्यास सुरवात झाली असल्याची माहिती रिअल इस्टेट व्यावसायिकांकडून मिळाली.

हेही वाचा