पक्षाचा विषय आला की नितीन नवीन हेच बॉस आणि मी सामान्य कार्यकर्ता : पंतप्रधान नरेंद मोदी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्वात तरुण नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या नितीन नवीन यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कौतुकाचा वर्षाव केला. नितीन नवीन यांना त्यांनी “मिलेनियल पिढीचे प्रतिनिधी” संबोधत पक्षाची वैचारिक परंपरा पुढे नेण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे सांगितले. “पक्षाचा विषय आला की नितीन नवीन हेच बॉस आहेत आणि मी एक सामान्य कार्यकर्ता आहे.” असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
भाजपच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात नितीन नवीन यांनी नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, जे.पी. नड्डा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासहीत भाजपचे वरीष्ठ नेते, अन्य राज्यांतील मुख्यमंत्री उपस्थित होते.
भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “पक्षाचा विषय आला की नितीन नवीन हेच बॉस आहेत आणि मी एक सामान्य कार्यकर्ता आहे.” त्यांनी आतापर्यंत दिलेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे आणि यशस्वीरीत्या पार पाडल्याचे विशेषत्वाने नमूद केले.
नितीन नवीन यांच्या पिढीबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “ही ती पिढी आहे जिने बालपणी रेडिओवरून बातम्या ऐकल्या आणि आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सहज वापरते. तरूण ऊर्जा आणि संघटनात्मक अनुभव यांचा सुंदर संगम नितीनजींमध्ये आहे. याचा लाभ पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला होईल.”
४५ वर्षीय नितीन नवीन हे दिवंगत भाजप नेते व माजी आमदार नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र आहेत. बिहारमधील बांकिपूर विधानसभा मतदारसंघातून ते सलग पाच वेळा अपराजित आमदार राहिले आहेत. १९८० मध्ये जन्मलेले नितीन नवीन हे ‘मिलेनियल’ पिढीच्या सीमारेषेवर येतात.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भाजप राष्ट्रीय अध्यक्षांची जबाबदारी केवळ पक्षापुरती मर्यादित नसून, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मधील समन्वय राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. “भाजप हा केवळ पक्ष नाही, ती एक संस्कृती आहे, एक कुटुंब आहे. येथे नाती केवळ सदस्यत्वापुरती मर्यादित नसतात. भाजप ही प्रक्रिया-प्रधान परंपरा आहे, पद-प्रधान नाही. अध्यक्ष बदलतात, नेतृत्व बदलते; मात्र आमची मूल्ये आणि दिशा कायम राहते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप देशभरातील स्थानिक आकांक्षांना राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी नवोदितांसाठी भाजप हा राजकीय प्रवास सुरू करण्याचा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय असल्याचेही अधोरेखित केले.