जलसंपदा विभागाकडून ८ हजार चौरस मीटर जागा संपादीत

वाळपई : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत गोव्यातील (Goa) सत्तरी तालुक्यातील (Sattari Taluka) केरी येथे आधुनिक मत्स्यालय (Aquarium) उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून (Government) तयार करण्यात आला आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) (DPR) तयार करून मत्स्यव्यवसाय विभागाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दिली.
या प्रस्तावित मत्स्यालयात विविध प्रजातींचे मासे पाहण्याची सुविधा असणार असून, गोव्यातील पर्यटनाला चालना देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. या प्रकल्पासाठी जलसंपदा (पाटबंधारे) विभागाकडून सुमारे ८ हजार चौरस मीटर जागा मत्स्यव्यवसाय विभागाने संपादीत केली आहे. तयार करण्यात आलेला प्रकल्प अहवाल केंद्र व राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारकडून ६० टक्के आणि गोवा सरकारकडून ४० टक्के निधीच्या भागीदारीत राबविण्याचे नियोजन आहे.
मिरामार ऐवजी आता केरीत होणार प्रकल्प
यापूर्वी हे मत्स्यालय मिरामार येथे उभारण्याचा प्रस्ताव होता; मात्र तो नंतर रद्द करण्यात आला. सध्या हा प्रकल्प केरी गावात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. केरी–सत्तरी परिसराला नवे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचा विचार आहे. मात्र; अद्याप या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळालेली नाही.
प्रधानमंत्री योजनेअंतर्गत लाभ घेऊन हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. या सोबतच मत्स्यव्यवसायावर आधारित संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे.
ग्रामीण पर्यटनाला चालना
हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास सत्तरीतील ग्रामीण पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. केरी–सत्तरी परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला असून, येथील प्रसिद्ध आजोबा देवस्थानाच्या सुशोभीकरणासाठी सध्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येत आहे. मंदिराच्या सौंदर्यात वाढ होत असतानाच प्रस्तावित मत्स्यालयामुळे या भागातील पर्यटन क्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.
केरी येथून चोर्ला मार्गे जाणारा बेळगाव रस्ता पावसाळ्यात विशेषतः पर्यटकांना आकर्षित करतो. परिसरातील धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. अशा निसर्गरम्य वातावरणात मत्स्यालय उभारल्यास या भागातील पर्यटन विकासाला नवे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.