पशुपालन संचालक : नसबंदीसाठी प्रत्येक कुत्र्यामागे मिळतात १,८०० रुपये
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पंचायती आणि पालिकांकडून कुत्र्यांच्या नसबंदीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. नसबंदीसाठी प्रत्येक कुत्र्यामागे पशुपालन आणि पशुसंवर्धन खाते पंचायत, पालिकांना १,८०० रुपये देत असतानाही बहुतांशी पंचायती, पालिका त्यासाठी पुढाकार घेत नाहीत, अस पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक यांनी शुक्रवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांत अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. काहीच दिवसांपूर्वी फोंडा तालुक्यातील दुर्गाभाट येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात १९ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली होती. भटक्या कुत्र्यांना कायद्यानुसार मारता येत नाही; परंतु त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नसबंदीचा उपाय आहे. ही जबाबदारी पंचायती आणि पालिकांची असतानाही त्यांच्याकडून भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याकडून पंचायती आणि पालिकांना प्रती कुत्र्यामागे १,८०० रुपये दिले जातात. पण, ही जबाबदारी पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याची असल्याचे सांगत पंचायती आणि पालिका जबाबदारी झटकत आहेत, असे संचालक डॉ. नितीन नाईक यांनी स्पष्ट केले.
गणना पूर्ण; आकडा केंद्रच करणार जाहीर
केंद्र सरकारच्या आदेशानुसार पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याकडून राज्यातील प्राण्यांची गणना पूर्ण करण्यात आली आहे. यासंदर्भातील आकडेवारी केंद्र सरकारकडूनच काही महिन्यांनंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतरच राज्यात भटकी, पाळीव, हिंस्र कुत्री किती आहेत. तसेच इतर प्राण्यांची संख्या किती आहे, हे समोर येईल, असेही डॉ. नितीन नाईक यांनी नमूद केले.