शनिवारी तलाव ते प्रस्तावित जागेपर्यंत गुगल इमेजरीसह संयुक्त तांत्रिक पाहणी

मॉलच्या प्रभाव क्षेत्राचे सर्वेक्षण स्थगित.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
शनिवारी तलाव ते प्रस्तावित जागेपर्यंत गुगल इमेजरीसह संयुक्त तांत्रिक पाहणी

पणजी : कदंब पठारावरील प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्पावरून गेल्या अनेक दिवसांपासून चिंबलमध्ये तणावाचे वातावरण असून, शुक्रवारी विविध सरकारी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वादग्रस्त जागेची संयुक्त पाहणी केली. एकीकडे ग्रामस्थांनी या प्रकल्पाच्या विरोधात आपले बेमुदत आंदोलन सुरूच ठेवले असताना, दुसरीकडे विविध पथकांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पोहोचून तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींचा सविस्तर आढावा घेतला आहे.


Mission Green Goa: The Backyard Class 76: Toyaar Lake


दरम्यान, काही तज्ज्ञ सदस्य अनुपस्थित असल्याने, काही कागदपत्रे नसल्याने तसेच केवळ मॉलच्या जागेची पाहणी करण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने आजचे सर्वेक्षण स्थगित करण्यात आले. आता उद्या तोयार तलावापासून प्रस्तावित जागेपर्यंत गुगल इमेजरीसह संयुक्त तांत्रिक पाहणी होईल. हा परिसर मोठा असल्याने संपूर्ण प्रक्रियेसाठी किमान ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



आजच्या या पाहणी दौऱ्यामध्ये राज्य भूमी अभिलेख विभाग, गोवा राज्य जैवविविधता मंडळ (GSBB), राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (NIO), जलस्रोत विभाग (WRD) आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ (GTDC) यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. प्रकल्पाच्या जागेवरून सध्या शासन आणि आंदोलकांमध्ये परस्परविरोधी दावे केले जात आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही जागा प्रभाव क्षेत्राच्या बाहेर असल्याचे स्पष्ट केले असले तरी, आंदोलकांनी ही जागा प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याचा दावा लावून धरला आहे. 


शुक्रवारी झालेल्या पाहणी दरम्यान, प्रस्तावित मॉलच्या जागेची भौगोलिक स्थिती आणि तांत्रिक पैलूंची अधिकाऱ्यांनी सखोल तपासणी केली. स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध पाहता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या संयुक्त पाहणीवेळी आंदोलकांनी प्रभाव क्षेत्राच्या फेरतपासासाठी अधिकाऱ्यांकडे लेखी आश्वासनाची मागणी केली. अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलकांचा तणाव काहीसा निवळला, मात्र त्यांनी केवळ मॉलची जागाच नव्हे तर तलावाच्या संपूर्ण परिसराची पाहणी करण्याची मागणी केली आहे.



प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी येथील महिला आंदोलकांनी पारंपरिक लोकगीतांच्या माध्यमातून आपला निषेध नोंदवला. जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन ठोस तोडगा काढत नाही, तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली आहे. प्रभाव क्षेत्राच्या लेखी फेरतपासणीच्या अटीवर शुक्रवारची पाहणी पार पडली असून, आता सर्वांचे लक्ष उद्यापासून सुरू होणाऱ्या सविस्तर सीमांकनाकडे लागले आहे.


हेही वाचा