बिरदेवच्या जिद्दीला सलाम ! मेंढपाळाचा मुलगा बनला आयपीएस अधिकारी

परीक्षेत ५५१ वा क्रमांक मिळवत घातली यशाला गवसणी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
24th April, 07:56 pm
बिरदेवच्या जिद्दीला सलाम ! मेंढपाळाचा मुलगा बनला आयपीएस अधिकारी

कोल्हापूर : जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यशापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागत नाही. ध्येय उराशी बाळगलेल्यांसाठी परिस्थिती कधीच आडकाठी बनू शकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बिरदेव सिद्धप्पा ढोणे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील यमगे या लहानशा गावातील मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव या युवकाने केंदीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होवून आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. यूपीएससी २०२४ च्या परीक्षेत त्याने ५५१ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.

बिरदेव यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण यमगे केंद्र शाळेत, तर दहावीपर्यंतचे शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूलमधून झाले. दहावीत ९६ टक्के गुण मिळविल्यानंतर त्यांनी मुरगूडच्या शिवराज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेतला. बारावीत ८९ टक्के गुण मिळविल्यानंतर त्यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बी. टेक. पूर्ण केले. नागरी सेवेच्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षेत ते यश मिळवू शकले नाहीत. तिसऱ्या प्रयत्नात मात्र पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी अधिकारी पदाचे स्वप्न पूर्ण केले. 

२ हजार ८४५ जणांनी दिली मुलाखत
पूर्व परीक्षेला १३ लाख ४ हजार परीक्षार्थी बसले होते. त्यात उत्तीर्ण झालेले १४ हजार ६२७ परीक्षार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यातील २ हजार ८४५ जणांनी उत्तीर्ण होऊन मुलाखत दिली. परीक्षा एकूण एक हजार ५६ पदांसाठी झाली होती.       

हेही वाचा