खतांच्या पिशव्यात लपवली होती स्फोटके; यापूर्वी स्फोटांमध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याने यंत्रणा सतर्क

जयपूर : नववर्षाच्या (New Year) पूर्वसंध्येला राजस्थानमधील (Rajsthan) टोंक येथे सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई केली. जिल्हा विशेष पथकाने टोंक, जयपूर राष्ट्रीय महामार्ग ५२ क्रमांकावर एका कार मध्ये लपवून ठेवलेली स्फोटके (Explosives) जप्त केली. मारुती सियाज कारमध्ये जप्त केलेल्या या स्फोटकात १५० किलो अमोनियम नायट्रेट (Ammonium nitrate), सुमारे २०० धोकादायक एक्सप्लोझिव्ह कार्ट्रिज व ६ गठ्ठे सेफ्टी फ्यूज वायर (अंदाजे ११०० मीटर) जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली जात आहे.
डीएसटी प्रभारी ओमप्रकाश चौधरी व त्यांच्या हाताखालील पथकाने ही कारवाई केली. यासंदर्भात पोलिसांना (Police) सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, एनएच ५२ वर स्फोटक साहित्याची वाहतूक होणार आहे. त्यानंतर बरौनी पोलिसांनी आपल्या हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मारुती सियाज कारची पडताळणी केली असता, युरिया खताच्या पिशव्यांमध्ये लपवण्यात आलेले अमोनियम नायट्रेट सापडले.
याप्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र पटवा व सुरेंद्र मोची या दोघांना अटक केली आहे. एखाद्या मोठ्या कटाचा भाग म्हणून स्फोटके एका जागेवरून दुसरीकडे हलवण्यात येत होती, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात माहिती देताना टोंकचे डीएसपी मृत्युंजय मिश्रा यांनी सांगितले की, कारमधून जप्त करण्यात आलेले अमोनियम नायट्रेट एकदम धोकादायक असून, स्फोटक कारवायांत त्याचा वापर केला जाऊ शकतो. यापूर्वी दिल्ली व इतर काही ठिकाणी झालेल्या स्फोटांत अमोनियम नायट्रेटचा वापर झाला होता. त्यामुळे सापडलेल्या स्फोटकांचा विषय पोलीस यंत्रणेने गांभीर्याने घेऊन तपास सुरू केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी स्फोटक साहित्य कोठून आणले व कुठे पाठवायचे होते व याप्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का? अटक केलेल्यांचा मोठ्या टोळीशी किंवा मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कशी जवळीक आहे का, याची माहिती पोलीस यंत्रणा घेत आहे. स्फोटके जप्त केल्यानंतर टोंकसहीत परिसरातील जिल्ह्यामध्ये सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.