पित्याचा मृत्यू तर मुलगी सापडली जर्जर अवस्थेत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील महोबा जिल्ह्यात (Mahoba District) एक माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. कुणी आधार नसल्याने काळजीवाहक (Care Taker) म्हणून ठेवलेल्यानेच एका निवृत्त रेल्वे कर्मचारी (Retired Railway Staff) व त्याच्या मानसिक दिव्यांग मुलीला पाच वर्षे कोंडून ठेवले. सोमवारी प्रकार उघडकीस आल्यावर इसम मृतावस्थेत सापडला तर मुलगी जर्जर स्थितीत सापडली.
ओमप्रकाश यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक घरी आले. घरातील स्थिती पाहून त्यांनाही धक्का बसला. काळजीवाहक म्हणून ठेवलेल्याने पाच वर्षे घरात कोंडून ठेवून छळ केल्यानेच ओमप्रकाश यांचा मृत्यू झाल्याचे व मुलगी जर्जर होऊन पडल्याचे नंतर उघडकीस आले.
७० वर्षीय निवृत्त वरिष्ठ रेल्वे लिपिक ओमप्रकाश सिंह राठोड आणि त्यांची २७ वर्षीय दिव्यांग मुलगी रश्मी, ओमप्रकाश यांच्या पत्नीचा २०१६ मध्ये मृत्यू झाल्यानंतर वेगळ्या घरात राहायला गेले होते. ओमप्रकाश यांचे भाऊ अमर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने काळजी घेण्यासाठी राम प्रकाश कुशवाह आणि त्यांची पत्नी रामदेवी यांना कामावर ठेवले होते.
मात्र, त्या जोडप्याने संपूर्ण घरावर ताबा मिळवला, वडिलांना आणि मुलीला खालच्या खोल्यांमध्ये कोंडून ठेवले. तर ते स्वतः वरच्या मजल्यावर आरामात राहत होते. त्या जोडप्याने पीडितांना मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले. नातेवाईक भेटायला यायचे, तेव्हा तो नोकर काहीतरी कारण सांगून त्यांना परत पाठवून द्यायचा आणि म्हणायचा की, ओमप्रकाश यांना कोणालाही भेटायचे नाही, असे अमर यांनी सांगितले.
सोमवारी ओमप्रकाश यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबाला कळताच, नातेवाईक घरी पोहोचले आणि त्यांना एक धक्कादायक दृश्य दिसले. ओमप्रकाश यांचे शरीर पूर्णपणे कृश झाले होते आणि त्यांची मुलगी एका अंधाऱ्या खोलीत बिकट स्थितीत आढळली. अंगावर कपडेही नव्हते. एका नातेवाईकाने दावा केला की, उपासमारीमुळे रश्मीचे शरीर ८० वर्षांच्या वृद्धेसारखे दिसत होते. "तिच्या शरीरावर मांस शिल्लक नव्हते; फक्त हाडांचा सांगाडा उरला होता, ती कशीबशी जिवंत होती," असे पुष्पा सिंह राठोड या नातेवाईकाने सांगितले.
हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी ओमप्रकाश यांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. एकेकाळी सन्मानाचे जीवन जगणाऱ्या, नेहमी सूट-टाय घालणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याची ही दुर्दशा पाहून ओमप्रकाश यांचे शेजारी थक्क झाले आहेत. सध्या कुटुंब रश्मीची काळजी घेत आहे आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.