तीन तास अत्याचार करून महिलेला धावत्या गाडीतून दिले फेकून

फरीदाबाद : फरीदाबादमध्ये मंगळवारी पहाटे एका २५ वर्षीय महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने व्हॅनमध्ये बसवून दोन नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अत्याचारानंतर आरोपींनी महिलेला धावत्या गाडीतून फेकून दिले असून, सध्या ती गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सोमवारी मध्यरात्री सेक्टर २३ मधील आपल्या मैत्रिणीच्या घरून घरी परतत होती. कल्याणपुरी परिसरातील मेट्रो चौकाजवळ ती वाहनाची वाट पाहत असताना, दोन व्यक्तींनी व्हॅनमधून तिला लिफ्ट देण्याचे आमिष दाखवले.
फरीदाबाद पोलीस प्रवक्ते यशपाल सिंह यांनी सांगितले की, महिलेला गाडीत बसवल्यानंतर आरोपींनी गाडी गुरुग्रामच्या दिशेने नेली. एका डोंगराळ भागात गाडी उभी करून दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. सुमारे तीन तास हा अत्याचाराचा थरार सुरू होता. त्यानंतर आरोपींनी तिला एका निर्जन रस्त्यावर धावत्या व्हॅनमधून बाहेर फेकून दिले. या घटनेत महिलेच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.
अत्याचारानंतर पीडित महिलेने कसाबसा आपल्या बहिणीला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. तिला सुरुवातीला नागरी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तिला दिल्ली येथे एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. गंभीर दुखापतींमुळे ही महिला सध्या जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींना अटक; गुन्हा दाखल
पीडित महिलेच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. हे आरोपी मूळचे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील रहिवासी असून सध्या फरीदाबादमध्ये राहत असल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे.