आदेश जारी : केंद्रीय गृहमंत्र्यांचा सर्व मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : ‘तुमच्या राज्यांमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि त्यांना तातडीने परत पाठवण्यासाठी आवश्यक पावले उचला’, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या. अधिकाऱ्यांसोबतच्या दीर्घ बैठकीनंतर शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून वरील निर्देश जारी केले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश होता. या घटनेनंतर जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत. सध्या पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय जवानांकडून दहशतवादविरोधी मोहीम राबवण्यात येत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधून परतताच शुक्रवारी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला. पहलगाम हल्ल्याबद्दल माहिती देतानाच शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याचे निर्देश दिले. भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी असलेल्या सर्व व्हिसा सेवा तत्काळ बंद करण्याचा निर्णय २४ एप्रिल रोजी घेतला होता. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.
चकमकीत एलईटीचा टॉप कमांडर ठार
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. दहशतवाद्यांच्या हालचालीबाबत मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या बांदीपोरा येथील कुलनार अजस परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले. यावेळी भारतीय सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) टॉप कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले.
संशयास्पद खेचर सवारी करणाऱ्याला अटक
पहलगाम हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपवर चॅटिंगचा फोटो आणि स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. त्यावर पहलगाममध्ये खेचर सवारी करणाऱ्या एका व्यक्तीचे चित्र आहे. खेचर मालकाने लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले होते. ते शस्त्रांबद्दलही बोलत होते, असा दावा उत्तर प्रदेशातील मॉडेल एकता तिवारीने केला आहे. व्हायरल फोटोवर दिसणारी व्यक्ती अयाज अहमद जुंगाल असल्याची ओळख पोलिसांनी पटवली. शुक्रवारी गंदरबल पोलिसांनी त्याला अटक केली. तो गंदरबल येथील गोहीपोरा रायजानचा रहिवासी आहे. सोनमर्गमधील थजवास ग्लेशियर येथे पोनी सेवा (खेचर सवारी) तो प्रदान करतो. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
हल्ल्यात सहभागी एकाचे घर स्फोटात उद् ध्वस्त, तर दुसऱ्याच्या घरावर बुलडोझर
जम्मू-काश्मीर प्रशासनाने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी स्थानिक दहशतवादी आदिल शेखचे त्राल येथील घर बुलडोझरच्या साहाय्याने पाडले. तसेच अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहराच्या गोरी परिसरात स्थित अन्य एका दहशतवाद्याचे घर बॉम्बने उडवून देण्यात आले. बिजबेहराच्या आदिल थोकर उर्फ आदिल गुरीवर दहशतवाद्यांना पहलगामच्या बैसरन येथील खोऱ्यात हल्ला करण्याची योजना आखणे, त्याला मूर्त स्वरूप देणे, त्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करण्याचा आरोप आहे. सैन्य सूत्रांच्या माहितीनुसार, आदिल शेख २०१८ मध्ये अटारी-वाघा बॉर्डरद्वारे वैध पद्धतीने पाकिस्तानला गेला होता. त्याने एका दहशतवादी छावणीत प्रशिक्षण घेतले आणि गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये परतला.