आज सायंकाळी संसदेत बोलावली सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तत्काळ धोरणात्मक पावले उचलली आहेत. आज संध्याकाळी ६ वाजता सरकारने संसदेत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील. काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सहभागी होणार आहेत.
दरम्यान, भारताच्या संभाव्य प्रत्युत्तराच्या भीतीने पाकिस्तानने हालचाली सुरू झाल्या आहेत. कराची एअरबेसवरून १८ फायटर जेट्स भारताच्या सीमेलगतच्या एअरफोर्स स्टेशन्सकडे पाठवण्यात आले आहेत. २४-२५ एप्रिल रोजी कराची येथे किनाऱ्यालगतच्या विशेष आर्थिक क्षेत्रात पाकिस्तानने ग्राऊंड टू ग्राऊंड क्षेपणास्त्राच्या चाचणीचा आदेश जारी केला होता.
पाकिस्तानची त्रेधातिरपट!
हाती आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी मंगळवारी संध्याकाळी तीन्ही सैन्यदलांच्या कमांडर्सची आपत्कालीन बैठक घेतली. कराची एअरबेसवरून चीन निर्मित १८ जेएफ-१७ फायटर जेट्स भारतानजीक असलेल्या लाहोर व रावळपिंडी येथील हवाई तळांवर हलवण्यात आले आहेत. याशिवाय ७४० किमी लांब नियंत्रण रेषेवर सैन्य तैनातीत वाढ करण्यात आली आहे. पीओके(पाकव्याप्त काश्मीर) मधील लश्करच्या लॉन्च पॅडवर भारताकडून स्ट्राइक होऊ शकतो, असा अंदाज मुनीर यांना आहे. पाकिस्तानने अरब सागरात फायरींग ड्रिल्स सुरू केल्या आहेत. तसेच २० कॉम्बॅट फायटर जेट स्क्वॉड्रन्सना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करणे, भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत देश सोडावा, दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत भारत सोडावा, पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयातील सर्व सल्लागारांना परत बोलावणे, सिंधु जल करार तात्काळ स्थगित आदी महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुधवारी सायंकाळी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षेच्या बाबींवरील मंत्रिमंडळाची बैठक झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, भारत सरकारने अटारी सीमेवर सध्या कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. काल भारत सरकारने वीजावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक अटारी पोस्टमार्गे मायदेशी परतत आहेत. दरम्यान पाकिस्तान सरकारच्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने अमेरिकन नागरिकांना जम्मू-कश्मीरमध्ये न जाण्याची सूचना दिली आहे.