एअरलाइन कंपन्यांकडून संकटाच्या काळातही नफा कमावण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून विमान कंपन्या घरवापसीसाठी भरमसाठ भाडे वसूल करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आदेश जारी करूनही, काही एअरलाइन्सकडून श्रीनगरहून देशातील प्रमुख शहरांना जाणाऱ्या तिकिटांचे दर २ ते ४ पट वाढवण्यात आले.
पर्यटकांनी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत एअरलाइन कंपन्यांकडून संकटाच्या काळातही नफा कमावण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार केली. काही विमानांचे तिकिट दर ५०,००० रुपयांपर्यंत पोहोचले होते. सध्या दरात थोडी घट झाली असली तरी भाडे १७ ते २३ हजार रुपयांच्या आसपास आहेत.
केंद्र सरकारचा हस्तक्षेप
केंद्रीय नागर विमानन मंत्री राममोहन नायडू यांनी तातडीची बैठक घेऊन सर्व एअरलाइन कंपन्यांना नियमित दर कायम ठेवण्याचे आदेश दिले. तसेच, मृत व्यक्तींचे मृतदेह त्यांच्या राज्यांमध्ये पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याचे निर्देश दिले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानेही (डीजीसीए) एअरलाईन्सना तिकिट दर न वाढवण्याची सूचना केली होती. तसेच पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी अधिक उड्डाणांची व्यवस्था करण्याची देखील सूचना केली होती.
काही कंपन्यांकडून शुल्क माफ
इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा तसेच स्पाईसजेटसारख्या कंपन्यांनी ३० एप्रिलपर्यंतच्या श्रीनगर उड्डाणांसाठी फ्लाइट कॅन्सलेशन व पुनर्नियोजन शुल्क माफ केल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांची भावना
दु:खद घटनेनंतर आमचे पाहुणे श्रीनगर सोडताना पाहून हृदय विदीर्ण झाले, प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग-४४ वाहतुकीसाठी सुरू करण्याचे आदेश दिले असून, पर्यटकांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले.