काही दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी घेरले असून, बांदीपोरातून लष्कर-ए-तैयबाच्या चार ओव्हर ग्राउंड वर्कर्सना अटक करण्यात आली आहे.
श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या २४ तासांतील तिसरी चकमक सध्या सुरू आहे. दरम्यान उधमपूर जिल्ह्यातील डूडू बसंतगड भागात काही दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी घेरले आहे. या कारवाईदरम्यान ६ पॅरा एसएफ युनिटमधील हवालदार झंटू अली शेख यांना गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा हौतात्म्य प्राप्त झाले. व्हाइट नाइट कॉर्प्सने X (ट्विटर) वरून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
लष्कर-ए-तैयबाचे चार ओव्हर ग्राउंड वर्कर्सना अटक
लष्कर-ए-तैयबाच्या ओव्हर ग्राउंड वर्कर्सनी दहशतवाद्यांसोबत मिळून स्थानिक पोलिसांवर व परराज्यातील नागरिकांवर हल्ल्याचा कट रचला होता, अशीही माहिती समोर आली होती. इनपुटच्या आधारे बांदीपोरा पोलिसांनी विविध भागांत कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. दरम्यान बांदीपोरा जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाशी संबंधित चार ओव्हर ग्राउंड वर्कर्सना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद रफीक खांडे आणि मुख्तार अहमद डार या दोघांना अडवून तपासणी केली असता त्यांच्याकडून २ चीनी हँड ग्रेनेड,१ मॅगजिन (७.६२मिमी), ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तर, दुसऱ्या ठिकाणी एफ-कॉय सीआरपीएफच्या तिसऱ्या बटालियन आणि १३ राष्ट्रीय रायफल्स अजास कॅम्पच्या सहकार्याने रईस अहमद डार आणि मोहम्मद शफी डार यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडूनही १ हँड ग्रेनेड, १ मॅगजिन (७.६२ मिमी), ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
सुरक्षा व्यवस्था अधिक कडक
संपूर्ण जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, संभाव्य ठिकाणी नाकाबंदी व गस्त वाढवण्यात आली आहे. एन्काऊंटर ऑपरेशन अद्याप सुरू असून दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.