पर्यटन स्थळे, इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर
श्रीनगर : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात भारतीय नौसेनेचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात एकूण २६ लोक मारले गेले. त्यात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, ओडिसासह इतर राज्यातील पर्यटकांचा समावेश आहे.
२६ वर्षीय लेफ्टनंट विनय नरवाल हे मूळचे हरियाणाचे होते. गेल्या आठवड्यात १६ एप्रिलला त्यांचं लग्न गुरुग्रामच्या हिमांशीसोबत मसुरी येथे झाले होते. हिमांशी पीएचडी करत असून ती सध्या मुलांना ऑनलाइन शिकवते.
मिळालेल्या माहितीनुसार लग्नानंतर विनय आणि हिमांशी यांनी युरोपमध्ये हनिमूनचा प्लॅन केला होता. पण व्हिसा मिळू शकला नाही आणि युरोपला जाण्याचा कार्यक्रम रद्द झाला. यानंतर, २१ एप्रिल रोजी दोघेही जम्मू आणि काश्मीरला रवाना झाले. २२ एप्रिल रोजी ते पहलगाममधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. दरम्यान दहशतवादी हल्ला झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. याबाबत त्यांनी एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये, असे म्हटले आहे की, "जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरी व्हावी अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्याय मिळेल...त्यांना सोडले जाणार नाही! दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे.
लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस अलर्ट मोडवर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व एजन्सींसोबत उच्चस्तरीय सुरक्षा बैठकी घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी हल्ल्यातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनंतनागमधील पहलगाम, बैसरन या सामान्य भागात शोध मोहीम सुरू केली आहे. तसेच दिल्ली पोलिसांना पर्यटन स्थळे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.