नव्या शैक्षणिक वर्षापासून होणार सुरुवात
नवी दिल्ली : केंद्र सरकारने विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता वाढावी यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून देशभरातील शाळांमध्ये रस्ता सुरक्षेशी निगडीत शिक्षण दिले जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत माहिती दिली.
एनसीईआरटीला इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्ता सुरक्षा ही ऐच्छिक नाही, ती दैनंदिन जीवनाचा भाग आहे. लहानपणापासूनच योग्य सवयी लागाव्यात यासाठी हे शिक्षण आवश्यक आहे,असे प्रधान यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
रस्ते अपघातांची भीषण आकडेवारी
कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील रस्ते अपघातांबाबत चिंताजनक आकडेवारी मांडली. दरवर्षी देशात सुमारे ५ लाख रस्ते अपघात होतात, यात १.८ लाख लोकांचा मृत्यू होतो आणि ३ लाखांहून अधिक जखमी होतात. त्यातल्या त्यात १८ वर्षांखालील सुमारे १० हजार मुले मृत्युमुखी पडतात. हे चक्र कुठेतरी थांबायला हवे असे ते म्हणाले.
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपये बक्षीस
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना सरकारकडून २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची योजनाही जाहीर करण्यात आली आहे. यामागचा उद्देश असा आहे की, मदत करण्यास लोक भीती न बाळगता पुढे यावेत, असे गडकरी यांनी स्पष्ट यावेळी स्पष्ट केले .