घरातील बाथरूममध्ये भरदिवसा घुसला बिबट्या

विलियण सांगे येथील प्रकार : वन कर्मचाऱ्यांनी पकडल्याने दिलासा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
घरातील बाथरूममध्ये भरदिवसा घुसला बिबट्या

सुभाष गावकर यांच्या घरात शिरलेला बिबट्या. (संदीप मापारी)

सांगे : सांगे मतदारसंघातील विलियण गावात गुरुवारी सकाळी येथील सुभाष गावकर यांच्या घरात अचानक एक बिबट्या शिरल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या बिबट्याने घरातील अथवा परिसरातील कोणालाही इजा पोहोचवली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
गावातील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्या सकाळी ६ च्या सुमारास गावातील मुख्य रस्त्यावरून चालत येत होता. रस्त्यावर काही लोकांना पाहूनही बिबट्याने त्यांच्याकडे लक्ष न देता थेट सुभाष गावकर यांच्या मागील दारातून घरात प्रवेश केला आणि बाथरूममध्ये जाऊन बसला. घरात बिबट्या शिरल्याचे लक्षात येताच गावकर कुटुंबीयांनी सतर्कता दाखवून तत्काळ मागील आणि पुढील दोन्ही दारांना कडी लावून घेतली, जेणेकरून बिबट्या बाहेर पडू नये. यानंतर, त्यांनी त्वरित वन खात्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.वन खात्याने घटनेची गंभीरता ओळखून तातडीने कार्यवाही केली. कर्मचाऱ्यांचे एक पथक त्वरित विलियण गावात दाखल झाले. परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर, वन कर्मचाऱ्यांनी पुढील दरवाजा खालच्या बाजूने कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी जाळीच्या साहाय्याने बाथरूममध्ये बसलेल्या बिबट्याला पकडले. बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले. त्यामुळे स्थानिक आणि गावकर कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास घेतला.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी वन्य प्राण्यांच्या मानवी वस्तीतील वाढत्या वावरावर चिंता व्यक्त केली आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, अलीकडे रानटी जनावरे वारंवार रस्त्यावर आणि घराच्या परिसरात दिसत आहेत. विशेषतः सायंकाळच्या वेळी ७ नंतर उगे परिसरात गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, ज्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
नागरिकांनी वन खात्याला याबाबत उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर वन खात्याने जंगलात वन्य जनावरांसाठी फळे आणि पाण्याची व्यवस्था केली, तर ही जनावरे पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येणार नाहीत. जंगलात पाण्याची तळी निर्माण केल्यास त्यांची तहान तिथेच भागेल. सध्या जंगलात पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे तहानलेली जनावरे पाणी पिण्यासाठी मानवी वस्तीत येत आहेत. त्यामुळे, वन खात्याने डोंगराळ भागात पाण्याची सोय करावी, जेणेकरून जंगली जनावरे रस्त्यावर येणार नाहीत आणि लोकांनाही जीव मुठीत धरून घराबाहेर पडण्याची गरज भासणार नाही, असे स्थानिक बोलून दाखवत आहेत.