जमीन हडप : रोहन हरमलकरला एका प्रकरणात सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन

गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय


07th May, 05:48 am
जमीन हडप : रोहन हरमलकरला एका प्रकरणात सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : हणजूण येथील जमीन हडप केल्या प्रकरणी गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) व्यावसायिक रोहन हरमलकर याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. यातील एका प्रकरणात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने हरमलकर याला एक लाख रुपये व इतर अटींवर सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. याबाबतचा आदेश न्या. वाल्मिकी मिनिझीस यांनी दिला आहे.
कॅनडा येथे स्थायिक जॉयसे एझाबेल पिंटो यांनी हणजूण येथील सर्वे क्रमांक ४४४/८ मधील २,४५० चौ.मी. आपली वडिलोपार्जित जमीन हडप करण्यात आल्याचा दावा केला. पिंटो यांच्यातर्फे मुखत्यारपत्रधारक अांतोनियो डिकॉस्टा यांनी एसआयटीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयित व्यावसायिक रोहन हरमलकर, मॅथ्यू डिसोझा, देवानंद कवळेकर, पीटर वाझ, फेलिक्स नोरोन्हा (शापोरा), धुळेर - म्हापसा येथील अल्कांत्रो डिसोझा, जुन डिसोझा, आर्किबाल्ड डिसोझा, थेरेझा डिसोझा, मॅक्सी डिसोझा, टीना डिसोझा, वॅरोनिका डिसोझा यांनी बनावट दस्तावेज तयार करून जमीन धुळेर म्हापसा येथील डिसोझा याच्या नावावर करून घेऊन रोहन हरमलकर याने डिसोझा कुटुंबियांसोबत करार केला. २८ जानेवारी २०१९ रोजी ती जमीन हरयाणा येथील आकाश चौधरी आणि सीमा चौधरी यांना विकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीची दखल घेऊन एसआयटीने गुन्हा दाखल केला.
दुसरी तक्रार बार्देशचे तत्कालीन निबंधक अर्जुन शेट्ये यांनी म्हापसा पोलीस स्थानकात दिली होती. त्यात हणजूण येथील सर्वे क्रमांक ४२६/५ मधील जमीन हडप केल्याचे म्हटले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण एसआयटीकडे वर्ग करण्यात आले. वरील दोन्ही प्रकरणांत रोहन हरमलकर याने मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. त्यातील एका प्रकरणात त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. त्यानंतर रोहन हरमलकर याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. न्यायालयाने त्याला १ लाख रुपयांच्या हमीवर, गोवा बाहेर न जाणे, आठ दिवस गुन्हा शाखेत हजेरी लावणे व इतर अटींवर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जून रोजी होणार आहे.
ईडीकडूनही हरमलकरविरोधात कारवाई
रोहन हरमलकर याच्या विरोधात जमीन हडप प्रकरणाची एसआयटीकडे दाखल केलेल्या गुन्ह्याची दखल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) घेतली. त्यानुसार, ईडीने चौकशी करून २४ आणि २५ एप्रिल रोजी हरमलकर याच्या पिळर्ण, पर्वरी, दिवाडी व इतर ठिकाणी छापा टाकला होता. त्यात ईडीने १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेल्या हणजूण, हडफडे, आसगाव आणि इतर ठिकाणच्या जमिनींची बनावट कागदपत्रे, तसेच ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तांची अस्सल कागदपत्रे जप्त केली आहे.                    

हेही वाचा