वेळगे-दाबोस पुलाच्या बांधकामाला जीएसआयडीसीच्या बैठकीत मंजुरी

सांगेतील रवींद्र भवनसाठी ७८ कोटी रुपयांची तजवीज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 hours ago
वेळगे-दाबोस पुलाच्या बांधकामाला जीएसआयडीसीच्या बैठकीत मंजुरी

पणजी : सत्तरी तालुक्यातील वेळगे-दाबोस पुलाच्या बांधकामाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (जीएसआयडीसी) बैठकीत या पुलासह सांगे येथील रवींद्र भवन प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली. रवींद्र भवनासाठी ७८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जीएसआयडीसीची बैठक पार पडली. बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार केदार नाईक, व्यवस्थापकीय संचालक हरीश अडकोणकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एकूण ५६० कोटी रुपये खर्चाच्या नऊ महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक इमारत (२८१ कोटी), पशु चिकित्सा महाविद्यालय इमारत  (१४३ कोटी), वेळगे-दाबोस पूल (१६ कोटी), रवींद्र भवन, सांगे (७८ कोटी), बोंदीर सांताक्रूझ येथील क्रीडा संकुल (९ कोटी), मुरगाव येथे २० खाटांचे आरोग्य केंद्र (१८ कोटी), पाळी - कोठंबी पंचायत इमारत (५.०५ कोटी रुपये) आणि बेतकी - खांडोळा मार्केट कॉम्प्लेक्स (२.५० कोटी रुपये) या प्रकल्पांना बैठकीत मान्यता देण्यात आली.पशुवैद्यकीय महाविद्यालयालाही सरकारने मान्यता दिली आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी १४३ कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. 

शैक्षणिक इमारतीसाठी लवकरच निविदा

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची शैक्षणिक इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सध्याच्या जागेवर २८१ कोटी रुपये खर्चून नवीन इमारत बांधली जाईल. इमारतीचे बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू होईल, असे जीएसआयडीसीने सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन ऑफिस आणि लेक्चर हॉलसाठी एक नवीन इमारत बांधली जाईल. सध्याची इमारत जुनी आहे त्यामुळे अद्ययावत सुविधांसह लेक्चर हॉलसाठी नवीन इमारत आवश्यक आहे. काही दिवसांत निविदा निघतील. 

हेही वाचा