अहवालावर पुढील निर्णय सरकार घेणार
पणजी : शिरगाव जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने अखेरीस पाच दिवसानंतर सरकारला अहवाल सादर केला आहे. हा अहवाल १०० पानांचा असून सरकारच अहवालावर पुढील निर्णय घेणार आहे. गुरूवारी रात्री उशीरा मुख्य सचिव डॉ. वी. कांडावेलू यांच्याकडे अहवाल सादर केला गेला, अशी माहिती चौकशी समितीचे प्रमुख संदीप जॅकीस यानी दिली.
अहवालावर मुख्यमंत्रीच भाष्य करतील असे सांगत त्यानी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मागच्या शनिवारी मध्यरात्री शिरगाव जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांना मरण आले होते. या चेंगराचेंगरीत ७० हून अधिक लोक जखमी झाले असून काही जणांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी सरकारने महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारीच समिती स्थापन केली होती.
वर्षा शर्मा (डीआयजी रेंज), प्रवीमल अभिषेक (वाहतूक संचालक) व टिकमसिंग वर्मा (पोलीस अधीक्षक, दक्षिण गोवा) हे समितीचे इतर सदस्य होते. समितीने जिल्हाधिकारी, पोलीस, देवस्थान समिती, जखमी यांचे जबाब नोंदवून चौकशी केली. समिती सोमवारी अहवाल देईल, असे सुरवातीला मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तरीही चौकशीस विलंब झाल्याने अहवालासही उशीर झाला.