भितीने लोक करताहेत पेट्रोलपंंपावर गर्दी
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे देशभरातील वातावरण संवेदनशील बनले आहे. अशा स्थितीत, जेव्हा सोशल मीडियावर पेट्रोल पंपांवर लांब रांगा आणि इंधन संकटाच्या अफवा वेगाने पसरत आहेत. तेव्हा देशातील सर्वात मोठी तेल विपणन कंपनी इंडियन ऑइलने पुढे येत लोकांना आश्वस्त केले आहे की, देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे घाबरण्याची कोणतीही गरज नाही.
कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक निवेदन जारी करून स्पष्ट केले की त्यांच्याकडे देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा आहे. सर्व पुरवठा साखळी सुरळीतपणे काम करत आहेत आणि सर्व किरकोळ विक्री केंद्रांवर इंधन सहज उपलब्ध आहे. इंडियन ऑइलने जनतेला आवाहन केले आहे की त्यांनी अनावश्यक भीतीमुळे इंधनाचा साठा करू नये आणि शांतता राखल्यास सर्वांना वेळेवर आणि पुरेसा इंधन मिळू शकेल.
अफवांना लागला ब्रेक
सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडिओ आणि पोस्टमध्ये असे दाखवले जात होते की इंधन संपण्याच्या भीतीने लोक पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत. या अफवांमुळे अनेक ठिकाणी तात्पुरता इंंधनाचा तुटवडा भासला होता. त्यामुळे इंडियन ऑइलने हे निवेदन जारी केले.
देशाचा कणा आहे इंडियन ऑइल
इंडियन ऑइलच्या ताकदीचा अंदाज यावरून लावता येतो की कंपनीची देशातील पेट्रोलियम मार्केटिंगमध्ये ४७ टक्के भागीदारी आहे. तर तेल शुद्धीकरण क्षमतेत तिचे योगदान सुमारे ४० टक्के आहे. भारतातील एकूण १९ रिफायनरींपैकी १० इंडियन ऑइलच्या मालकीच्या आहेत. याला सरकारद्वारे 'महारत्न'चा दर्जाही प्राप्त आहे.
इंंधनाचा पुरवठा अखंंडितपणे सुरू राहणार
ग्राहकांना केले हे आवाहन कंपनीने म्हटले आहे की इंधनाचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी लोकांनी संयम ठेवणे आणि अनावश्यक खरेदी टाळणे आवश्यक आहे. अनावश्यक गर्दी टाळल्यास आपण सर्वांना समान आणि वेळेवर इंधनाचा पुरवठा सुनिश्चित करू शकतो.