भारतातील अनेक भागात पाकिस्तानकडून गोळीबार
नवी दिल्लीः 'ऑपरेशन सिंदूर' पाकिस्तानकडून भारताच्या सीमारेषेजवळील गावांवर हल्ले सुरू असून पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे मुरली नाईक व दिनेश शर्मा हे २ जवान शहीद झाले आहेत. मुरली नाईक हे मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी आहेत.
तसेच पूँछ सेक्टरमध्ये गोळीबारात जवान दिनेश शर्मा हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जातेय.
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतातील अनेक भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने तातडीने कारवाई करत हे सर्व ड्रोन अडवले आणि त्यांना पाडण्यात यश मिळवले आहे. पाकिस्तानने भारतातील अनेक संवेदनशील भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने हल्ला सुरू केला.