कांदोळीत शॉर्ट सर्किटमुळे दुकान भस्मसात

वृध्द दाम्पत्य जखमी, ५ लाखांचे नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
कांदोळीत शॉर्ट सर्किटमुळे दुकान भस्मसात

म्हापसाः शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सेबेस्तियनवाडा, कांदोळी येथील पॅरी जनरल स्टोअर हे दुकान जळून खाक झाले आहे. आग लागताच दुकानातील दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दुकान मालक वृद्ध दाम्पत्य किरकोळ जखमी झाले असून आगीत अंदाजे ५ लाखांपेक्षा जास्त रूपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे.

लॉरेन्स परेरा (६८) व इस्बिन परेरा (६२) अशी जखमी दाम्पत्याची नावे आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी ११.५२ च्या सुमारास घडली. दुकानातील वीज उपकरणांमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. ही आग विझवण्याच्या प्रयत्नात वृद्ध परेरा दाम्पत्य जखमी झाले. 

आगीची घटना समजताच स्थानिकांनी सदर वृद्ध दाम्पत्याला बाहेर काढले.
आग विझवत असतानाच दुकानात असलेल्या दोन गॅस सिलिंडरचा भडका उडाला आणि आगीने संपूर्ण दुकानाला वेढले. 

घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पर्वरी अग्निशमन दलाचे सहकार्य घेत आग विझवली.  पिळर्ण अग्निशमन दलाचे उपअधिकारी सनी फायदे, शिाल पाटील, भावेश शिरोडकर, राजेश पिरणकर, ऋषिकेश कुबडे, परेश गावस तसेच पर्वरी अग्निशमन दलाचे प्रशात सावंत व सहकारी जवानांनी ही आग नियंत्रणात आणून विझवली. कळंगुट पोलीस निरीक्षक अनंत गावकर व सहकारी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
 
५ लाखांपेक्षा जास्त मालमत्तेचे नुकसान
या दुर्घटनेत दुकानातील तीन फ्रीज, इतर सर्व साहित्य तसेच दुकानाच्या मागच्या बाजूला पार्क केलेली स्कूटरही जळून भस्मसात झाली. त्यामुळे आगीत ५ लाखांपेक्षा जास्त मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशमन दल आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जखमी वृद्ध दाम्पत्यांवर कांदोळीतील बोसिओ हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.

हेही वाचा