चेंगराचेंगरी प्रकरणाला माजी अध्यक्षही जबाबदार असू शकतात, विद्यमान समितीचा आरोप
डिचोली : शिरगाव लईराई जत्रोत्सवामधील चेंगराचेंगरी ही प्रशासनाच्या जत्रोत्सव व्यवस्थेतील दिरंगाईमुळेच झाली असून या घटनेला विद्यमान देवस्थान समिती जबाबदार नसल्याचा पलटवार विद्यमान अध्यक्ष दीनानाथ गावकर व पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
समितीच्या माजी अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकाळात प्रशासनाकडे कोणताही पत्रव्यवहार केला नसून या चेंगराचेंगरी प्रकरणाला तेही जबाबदार असू शकतात, असा गंभीर आरोप विद्यमान अध्यक्ष दीनानाथ गावकर व पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी चेंगराचेंगरी प्रकरणावर भाष्य करत हे आरोप केले आहेत.
चेंगराचेंगरीच्या व्हिडिओ मधून धोंडांच्या वागणुकीबद्दल जे दिसतेय त्यावर आमचा आक्षेप आहे, धोंडावर आक्षेप नाही. होमकुंड आणि धोंड हे समीकरण आहे. त्यामुळे आम्ही धोंडांबाबत कारवाई करावी असे कधीही म्हणणार नाही. मात्र व्हिडिओमध्ये जे चित्रित झाले आहे, तो प्रकार चुकीचा आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे. पीडित कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. यापुढे अशा घटना घडू नये यासाठी देवस्थान समिती, महाजन प्रयत्न करणार असून यामध्ये प्रशासनाचे सहकार्य देखील आवश्यक आहे. मात्र या प्रकरणाची प्रशासनाने कसून चौकशी करावी, असे लईराई देवस्थान समितीचे विद्यमान अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी लईराई देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गणेश गावकर यांनी चेंगराचेंगरी प्रकरणी विद्यमान अध्यक्ष दीनानाथ गावकर हेच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यावर आता पत्रकार परिषद घेत विद्यमान समिती आणि अध्यक्षांनी पलटवार केला आहे.
माजी अध्यक्षांचे म्हणणे होते की...
लईराई जत्रोत्सवाला सरकारने राज्य उत्सवाचा दर्जा देण्याचे ठरवले होते. तसे झाले असते, तर भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व साधनसुविधा सरकारने तेथे स्वत:च्या खर्चाने उभारून दिल्या असत्या. पण देवस्थान समितीने जाणीवपूर्वक सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. असे असतानाही यंदाच्या जत्रोत्सवातही मामलेदार, पोलिसांकडून सर्व सहकार्य मिळाले होते. पण विद्यमान देवस्थान समितीने मात्र त्यांना अजिबात सहकार्य केले नसल्याचा आरोप माजी अध्यक्ष गणेश गावकर यांनी केला होता.