पाकिस्‍तानने आगळीक केल्‍यास दृढतेने प्रत्युत्तर देऊ

अजित डोवाल यांचा विविध राष्ट्रांच्या समकक्षांशी संवाद


08th May, 12:30 am
पाकिस्‍तानने आगळीक केल्‍यास दृढतेने प्रत्युत्तर देऊ

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : भारताचा तणाव वाढवण्‍याचा कोणताही हेतू नाही; परंतु पाकिस्‍तानने तणाव वाढवण्याचा किंवा भारतावर हल्‍ला करण्‍याची आगळीक केल्‍यास त्‍याला दृढतेने प्रत्युत्तर देण्यास आम्‍ही सज्‍ज आहोत, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी स्पष्ट केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि जपानमधील आपल्या समकक्षांना माहिती देताना डोवाल यांनी भारताची पुढील भूमिकाही स्‍पष्‍ट केली.
भारताने बुधवारी पहाटे पाकिस्‍तानवर हवाई हल्‍ला केला. या कारवाईनंतर अजित डोवाल यांनी तत्‍काळ अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, ब्रिटनचे जोनाथन पॉवेल, सौदी अरेबियाचे मुसैद अल ऐबान, युएईचे महामहिम शेख तहनौन आणि जपानचे मसाताका ओकानो यांच्याशी चर्चा केली. तसेच रशियन एनएसए सर्गेई शोइगु, सीपीसी सेंट्रल कमिटीच्या पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य आणि पीआरसीचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल बोन यांचे राजनैतिक सल्लागार यांच्याशीही संपर्क स्थापित करण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. येत्या काळात डोवाल त्यांच्या समकक्षांच्या संपर्कात राहतील, असेही सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे.

आज सर्वपक्षीय बैठक
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकारने गुरुवार, ८ मे रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक संसदीय ग्रंथालय इमारतीत होणार आहे.
अमित शहा यांची ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली. गृहमंत्री जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल आणि बीएसएफचे महासंचालक यांच्याशी संपर्कात आहेत. त्यांनी सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश बीएसएफ संचालकांना दिले आहेत.

भारताच्‍या धडक कारवाईनंतर पाकिस्‍तान नरमले !
पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍याचा बदला घेत भारताने पाकिस्‍तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्‍ला केला. या धडक कारवाईने पाकिस्‍तानची झोप उडाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने धडकी भरल्‍यामुळे पाकिस्‍तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नरमाईची भूमिका घेतली. हल्ल्यानंतर काही तासांतच ‘ब्लूमबर्ग’ टीव्‍हीशी बोलताना संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्‍हणाले, भारताने तणाव कमी केला तर पाकिस्तानही तणाव कमी करण्‍यास तयार आहे. आम्ही पंधरवड्यापासून सांगत आहोत की, आम्ही कधीही भारताविरुद्ध कोणतेही शत्रुत्वाचे पाऊल उचलणार नाही; परंतु आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. भारताने माघार घेतली तर आपण निश्चितच हा तणाव कमी करू.

पाकिस्तानचे खोटे दावे
भारताने फक्त ६ ठिकाणी हल्ले केले. हल्ले दहशतवादी अड्ड्यांवर नव्हे तर नागरी भागात झाले.
भारताने केलेल्या हल्ल्यांत २६ नागरिकांचा मृत्यू आणि ४६ जण जखमी झाले.
प्रत्युत्तरात १५ भारतीय ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.
पाकिस्तानी हवाई दलाने दोन भारतीय लढाऊ विमाने पाडली आणि काही सैनिकांना ताब्यात घेतले.
भारतीय कारवाईत १०० दहशतवादी नव्हे तर फक्त ८ नागरिक मारले गेले. त्यात २ मुले होती.
पाकिस्तानचे खोटे उघड
एका जुन्या व्हिडिओचा वापर करून, पाकिस्तानने श्रीनगर एअरबेसवर हल्ला झाल्याचे खोटे पसरवले. पाकिस्तान समर्थक अनेक सोशल मीडिया हँडलने हा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये पाकिस्तानी हवाई दलाने श्रीनगर एअरबेसला लक्ष्य केल्याचा दावा केला; तथापि, पीआयबी फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले की, हा व्हिडिओ २०२४ मध्ये खैबर पख्तूनख्वा येथे झालेल्या जातीय दंगलींचा आहे आणि त्याचा भारताशी काहीही संबंध नाही.

भारताकडून बदला घेऊ : पाकिस्तान पंतप्रधानांची कोल्हे कुई
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी पाकिस्तान संसदेत सांगितले की, भारताने भ्याड हल्ला केला आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने कारवाई केली. यामध्ये ५ भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली. यामध्ये ३ राफेल आहेत. पाकिस्तान शत्रूची विमाने समुद्रात पाडण्यास पूर्णपणे तयार आहे. पाकिस्तानच्या तिन्ही सैन्याने अनेक दिवसांपासून तयारी केली होती.

हेही वाचा