पणजी : गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने एलईडी मासेमारी आणि डिझेल जनरेटर (डीजी) संचांच्या वापरावर असलेल्या बंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे असा आदेश दिला आहे. मासेमारी नौकांवर डीजी संचांचा एकमेव उद्देश एलईडी दिव्यांना वीजपुरवठा करणे हा असून, हे दिवे मासे आकर्षित करण्यासाठी वापरले जातात. या पद्धतीवर २०१६ आणि २०१७ च्या आदेशांनुसार आधीच बंदी घालण्यात आली आहे, असे निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवले.
गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या अहवालानुसार कुटबण, मालीम आणि वास्को जेटीवर असलेल्या १६ पैकी किमान १४ नौकांवर डीजी संच आणि एलईडी दिव्यांची व्यवस्था आढळली. विशेष म्हणजे या नौकांमध्ये रेफ्रिजरेशन, रेडिओ उपकरणे किंवा इतर आवश्यक सुविधा नव्हत्या. यामुळे डीजी संचांचा वापर केवळ एलईडी मासेमारीसाठी होत असल्याचे स्पष्ट होते, असेही निरीक्षण या अहवालाच्या आधारे उच्च न्यायालयाने नोंदवला आहे.
न्यायालयाने मत्स्यव्यवसाय संचालनालय, गोवा किनारी पोलीस आणि भारतीय तटरक्षक दलाला मासेमारी नौकांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, बंदीचे उल्लंघन करणाऱ्या नौकांची नोंदणी आणि परवाने तात्काळ रद्द करण्याचेही आदेश दिले आहेत. या सोबतच तटरक्षक दलाला गोव्याच्या समुद्रसीमेवर सतत गस्त घालण्याचे आणि निरीक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पारंपरिक मच्छीमारांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.