९ दहशतवादी तळ उद् ध्वस्त : २५ मिनिटांत २४ क्षेपणास्त्रे डागली : १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा
भारतीय क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात उद् ध्वस्त झालेली मुझफ्फराबाद येथील बिलाल मशिद.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी अड्ड्यांवर बुधवारी रात्री हवाई हल्ले केले. यामध्ये बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली, मुझफ्फराबाद या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. या कारवाईत २४ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पहलगाम हल्याच्या १५ दिवसांनंतर तिन्ही सैन्याने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या कारवाईनंतर पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तुकड्या सक्रिय करण्यात आल्या आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ मंगळवारी रात्री १.०५ ते १.३० या दरम्यान राबवण्यात आले. २५ मिनिटांत अत्यंत अचूकतेने ९ लक्ष्यांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचा वरिष्ठ कमांडर हाफिज अब्दुल मलिक मुरिदके येथील मरकज तैयबा तळावर ठार झाला. विशेष म्हणजे जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच्या बहावलपूर येथील ‘सुभान अल्लाह’ मशिदीवरही हल्ला करण्यात आला. एका अहवालानुसार, यामध्ये अझहरच्या कुटुंबातील १० सदस्यांसह चार निकटवर्तीयांचा मृत्यू झाला. ६ मेच्या रात्री भारताने ‘आॅपरेशन सिंदूर’ यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर ७ मे रोजी दिल्लीमध्ये विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली.
पत्रकार परिषदेत संरक्षण यंत्रणेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला अधिकारी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. त्यांच्यासोबत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रीही उपस्थित होते. यावेळी दहशतवादी तळांचा नाश कसा झाला, कोणती शस्त्रास्त्रे वापरण्यात आली आणि भारताची कारवाई किती अचूक होती, याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यांनी हल्ल्याचे दोन मिनिटांचे कॉन्फिडेन्शीयल फुटेजही सादर केले. मिस्री म्हणाले, दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठीच ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आले. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असून, त्यांच्यावर कारवाई करण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारताने आत्मरक्षणाच्या अधिकाराचा वापर करून ही कारवाई केली. यानंतर पाकिस्तानने आगळीक केल्यास भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल. एअर स्ट्राईकच्या मोहिमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्यांना प्रत्येक क्षणाची माहिती देत होते.
दोन किलोमीटर अंतरावर घराच्या खिडक्या फुटल्या
स्थानिक पत्रकाराने म्हटले की, रात्री पहिला धमाका ऐकू आला, तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. काहीच वेळानंतर दुसरा धमाका ऐकू आला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, दोन किलोमीटर अंतरावरील घरांच्या खिडक्या फुटल्या.
पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत गोळीबार
भारताच्या कारवाईनंतर बावचळलेल्या पाकिस्तानने भारतीय हद्दीत गोळीबार केला. त्यात सुमारे ८ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले परदेश दौरे रद्द केले आहेत.
हल्ल्यात मसूद अझहरचे कुटुंबीय, सहकारी ठार
‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत बहावलपूर येथे करण्यात आलेल्या अचूक हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि जवळचे चार सहकारी मारले गेले आहेत. हे पाहून मसूद अझहरने ‘मी ही मेलो असतो बरे झाले असते,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. भारतीय हवाई हल्ल्यात मसूदची बहीणही ठार झाली. दहशतवाद्यांचे नातेवाईकही हल्ल्यात मारले गेले आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या मुफ्ती अब्दुल रऊफची नातवंडे, मोठ्या मुलीची ४ मुले जखमी झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये अधिकतर महिला आणि मुलांचा समावेश आहे.
उद् ध्वस्त झालेले तळ आणि तेथील दहशतवादी कारवाया
सवाई नाला आणि सैय्यदना बिलाल कॅम्प, मुजफ्फराबाद : येथे सोनमर्ग, गुलमर्ग व पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते.
गुरपूर आणि अब्बास कॅम्प कोटली : येथे पुंछ हल्ल्यातील दहशतवादी प्रशिक्षित झाले होते.
बरनाला कॅम्प, भिंबर : येथे शस्त्र प्रशिक्षण दिले जात होते.
सरजल आणि हिजबुल महमूना जाया कॅम्प, सियालकोट : येथे पठाणकोट आणि मार्च २०२५ च्या हल्ल्यांशी संबंधित दहशतवाद्यांचे वास्तव्य होते.
मरकज तैयबा, मुरिदके : येथे अजमल कसाब आणि डेविड हेडलीला प्रशिक्षण दिले गेले होते.
सुभान अल्लाह मशीद, बहावलपूर : जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय.
भारताच्या रणरागिणी
विंग कमांडर व्योमिका सिंह
१८ डिसेंबर २००४ रोजी भारतीय वायुदलात सामील झालेल्या व्योमिका सिंह या लढाऊ हेलिकॉप्टर पायलट आहेत.
त्यांनी ‘चेतक’ आणि ‘चीता’ यासारखी हेलिकॉप्टर्स अत्यंत कौशल्याने हाताळली आहेत.
२०१७ मध्ये त्यांना विंग कमांडर पदावर बढती मिळाली.
त्यांच्या नावावर हजारो तासांचे फ्लाईंग अनुभव असून त्या अत्यंत अनुभवी आणि धाडसी अधिकारी मानल्या जातात.
व्योमिका म्हणतात, “माझ्या नावाचा अर्थच आहे – आकाशाला मुठीत घेणारी’, त्यामुळे बालपणापासूनच मी हवाई दलात जाण्याचे ठरवले होते.”
कर्नल सोफिया कुरैशी
सिग्नल कोअरमध्ये सेवा देणाऱ्या कर्नल सोफिया कुरैशी या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
त्या बहुराष्ट्रीय लष्करी सराव ‘एक्सरसाइज फोर्स १८’चे नेतृत्व करतात.
त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेतही (कोंगो) सहा वर्षे योगदान दिले आहे.
गुजराती सैन्यकुळातून आलेल्या कुरैशी यांच्याकडे बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी आहे.
पत्रकार परिषदेत त्यांनी हिंदीमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणारी माहिती जगासमोर ठेवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणाले, ही कारवाई होणारच होती. ही अभिमानाची गोष्टी आहे. पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर अचूक हल्ला आणि कमी वेळात लक्ष्यांवर हल्ला केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सशस्त्र दलांच्या कामगिरीचे कौतुक केले. पंतप्रधानांनी हा एक नवीन भारत असल्याचे नमूद केले.
तणावामुळे २५ विमानतळ शनिवारपर्यंत बंद
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्चभूमीवर सुरक्षा आणि हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे २००हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शनिवार, १० मेपर्यंत २५ विमानतळे बंद ठेवण्यात आली आहेत. यामध्ये चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुंतर, किशनगड, पटियाला, शिमला, गग्गल, भटिंडा, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, हलवारा, पठाणकोट, जम्मू, लेह, मुंद्रा, जामनगर, राजकोट, पोरबंदर, कांडला, केशोड या विमानतळांचा समावेश आहे.
भारतीय जवानांना सलाम : मुख्यमंत्री
पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांचे नऊ ठिकाणचे तळ उद्धवस्त करणाऱ्या भारतीय जवानांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अधिकाधिक बळकट होत असल्याचे या हल्ल्यातून स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दहशतवाद्यांनी काहीच दिवसांपूर्वी जम्मू-काश्मिरातील पहलगाम येथे हल्ला केला. त्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा हात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे भारतानेही पाकिस्तानवर हल्ला करण्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू केली होती. अखेर, बुधवारी पहाटे १.०५ ते १.३० च्या सुमारास लढाऊ विमानांच्या साहाय्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर भारतीय जवानांनी हल्ला चढवला. त्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. भारतीय जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तराबद्दल आपण त्यांना सलाम करतो, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.