म्हापसा पालिकेचा प्रशासकीय कारभार कोलमडला

विरोधी नगरसेवकांचा आरोप : इतिवृत्त काही जणांकडून घरी नेऊन दुरुस्त केल्याचा आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th May, 01:00 am
म्हापसा पालिकेचा प्रशासकीय कारभार कोलमडला

म्हापसा : येथील पालिका मंडळाच्या बैठकींचा तपशील योग्य नोंद होत नाही. हे इतिवृत्त (मिनीटस् ) काहीजण घरी नेऊन आपल्याला हवे तेच मुद्दे त्यात समाविष्ट करतात, एकूणच पालिकेचा कारभार कोलमडला आहे, असा गंभीर आरोप करत विरोधी नगरसेवकांनी नगराध्यक्षांना धारेवर धरले. 

बैठकीच्या तपशीलमधील अनेक चुका नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून त्या सुधारण्याची सूचना केली असता या नाहक चर्चेमुळे पालिका बैठकीचा नेहमीप्रमाणे वेळ लांबवला जात असल्याचा दावा केल्यामुळे सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडाली. 

बुधवारी ७ रोजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मंडळाची सर्वसाधारण बैठक सुमारे आठ तास चालली. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, तसेच नगरसेवक, नगरसेविका, पालिका तथा प्रशासकीय अधिकारी अभय राणे, अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत गेल्या ३० ऑक्टोबर २०२४ च्या सर्वसाधारण बैठकीचे इतिवृत्त मंजुरीसाठी नगराध्यक्षांनी पालिका मंडळासमोर ठेवले. यात चर्चा केलेले अनेक मुद्दे समाविष्ट केले नसल्याचे नगरसेवक डॉ. तारक आरोलकर, अॅड शशांक नार्वेकर, कमल डिसोझा, आनंद भाईडकर यांनी नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. 

तसेच हे इतिवृत्त काही जणांकडून घरी नेऊन तयार केले जाते. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विरोधी नगरसेवकांचे मुद्दे जाणून बुजून फेरफार गेला जातो. हा गंभीर प्रकार असून यावरून पालिकेचा कारभार कोलमंडला आहे, असा आरोपही नार्वेकर व आरोलकर यांनी केला. 

बैठकीचे इतिवृत्त सुधारणाविषयीच्या चर्चेत जवळपास पाऊण तास खर्ची गेला. त्यानंतर सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी विरोधी नगरसेवक बैठक सुरळीत चालू नये म्हणून नाहक चर्चा करत असल्याचा दावा सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी केला. यावेळी सत्ताधारी गटातील चंद्रशेखर बेनकर, साईनाथ राऊळ, आशिर्वाद खोर्जुवेकर व विरोधी नगरसेवकांत शाब्दिक वादावादी झाली. 

त्यानंतर ज्या ६ कंत्राटी कामगारांची ठरावाच्या मंजुरीविना बेकायदेशीररीत्या केलेल्या नोकरी भरतीचा विषय वगळता इतर मुद्दे असलेल्या इतिवृत्ताला पालिका मंडळाने मान्यता दिली. तसेच विरोधी नगरसेवकांच्या मागणीनुसार यापुढे सात दिवसांच्या आत इतिवृत्त सर्व नगरसेवकांना देण्याचा आश्वासन दिले.

...अन्यथा ज्युनिअर स्टेनोग्राफरला बडतर्फ करा !
आमच्या सूचना, हरकती आणि प्रस्ताव जाणून बुजून इतिवृत्तातील तपशीलातून गाळल्या जातात. दरवेळी याची जाणीव करून देत ते इतिवृत्तात समाविष्ट करण्याची सूचना केली जाते. नगरपालिका कायद्यानुसार बैठकीच्या आठ दिवसांच्या आत इतिवृत्त नगरसेवकांना द्यायला हवे. मात्र असे असूनही ते सहा सहा महिने मिळत नाही. तरी देखील या चुका तशाच राहतात. असेच प्रकार होत असतील तर ज्युनिअर स्टेनोग्राफरला सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी शशांक नार्वेकर व तारक आरोलकर यांनी नगराध्यक्षांकडे केली. 

हेही वाचा