नववधू म्हणाली, ओल्या हळदीने 'ऑपरेशन सिंदूर'साठी 'सिंदूर' पाठवतेय...
जळगांव : भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानातील तब्बल ९ दहशतवादी स्थळं बेचिराख केली. हे ऑपरेशन राबवल्यानंतर पाकिस्तानने सीमेवर बेछूट गोळीबार सुरू केला. भारत आणि पाकिस्तानातील वाढलेला तणाव पाहता, लष्करातील जवानांना सुट्टी रद्द करून तत्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. महाराष्टातील जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील हे देखील देशसेवेसाठी तत्काळ ड्युटीवर हजर झाले. मात्र मनोज पाटील सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्याबाबत झालेल्या घडामोडीमुळे.
५ मे रोजी मनोज पाटील यांचे लग्न झाले. लग्नाला दोन दिवस उलटत नाहीत, तोवर भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना तत्काळ ऑन ड्युटी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पाच तारखेला लग्न झाल्यानंतर दोन दिवसांत अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह मनोज पाटील देशाच्या रक्षणासाठी तैनात झाले. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर झाल्यामुळे मनोज पाटील सध्या चर्चेत आहेत.
याबाबतची माहिती अशी की, नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा मनोज यांचे लग्न ठरले. लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आले होते. दरम्यान भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला. कोणत्याही क्षणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पाचोरा येथे लग्न समारंभ आटोपत नाही, तोच मनोज यांना लष्कराकडून बोलवण्यात आले.
देशसेवेचे व्रत घेतलेल्या मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन सीमेवर जाण्याचा मार्ग निवडला. देशसेवेसाठी अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेली मेहंदी घेऊन मनोज आज आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी रवाना झाले. स्टेशनवर त्यांना निरोप देण्यासाठी आलेले कुटुंबीय भावूक झाले होते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत असून मनोज यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
कुटुंबाचा पाठिंबा
कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच, कर्तव्यावर जावं लागत असल्याने माझ्या मुलाचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया, मनोजच्या वडिलांनी दिली. तर देशापेक्षा मोठे काहीही नाही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या पत्नीने दिली आहे.