समग्र शिक्षा अभियान घोटाळा प्रकरणात आणखी एकास अटक

पर्वरी पोलिसांनी कोलकातामध्ये आवळल्या मुसक्या


27th May 2025, 11:20 pm
समग्र शिक्षा अभियान घोटाळा प्रकरणात आणखी एकास अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : समग्र शिक्षा अभियानाच्या गोवा शाखेच्या बँक खात्यातून पाच कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी आणखी एका संशयिताला पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. कोलकातामधून संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
अफरातफरीचा प्रकार मार्च २०२५ मध्ये घडला होता. याप्रकरणी समग्र शिक्षा अभियानाचे संचालक डॉ. शंभू घाडी यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून रॉबिन पॉल (४१, रा. पश्चिम बंगाल) या कुशन व्यापार्‍याला अटक केली होती. संशयिताच्या बँक खात्यात या अफरातफरीतील १.८ कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित झाली होती.
संशयित आरोपी पॉलला व्यवसायासाठी बँकेतून कर्ज हवे होते. ते मिळवून देण्याच्या बदल्यात बँक खात्यात हस्तांतरित होणारी रक्कम काढून देण्याची अट संशयिताने त्यांना घातली होती. फरार संशयिताने पॉलच्या बँक खात्यात अफरातफरीच्या रकमेतील १.८ कोटी रूपये जमा केले आणि नंतर ते लगेच काढून घेतले होते. या बँक व्यवहारामार्फत पोलिसांनी पॉलला अटक केली होती.
संशयित आरोपी रॉबिन पॉल याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली व तो कोलकाता येथे असल्याची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांचे पथक 24 मे रोजी त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले होते. मंगळवार, २७ रोजी कोलकाता पोलिसांच्या साहाय्याने पर्वरी पोलिसांनी एका संशयिताला पकडून अटक केली. नंतर तेथील कायदेशीर प्रक्रियेअंती पोलीस पथक रवाना होऊन रात्री उशिरा गोव्यात दाखल झाले आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात ८ ते १० जणांच्या टोळीचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार आणखी एक पोलीस पथक गोव्याबाहेर आहे.

हेही वाचा
सर्व पहा