चिप्स हा बऱ्याच जणांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. बाजारात तर वेगवेगळ्या चवींचे चिप्स उपलब्ध असतात. चिप्सचे पॅकेट आणून ते फस्त करणं खूप सोपं आहे आणि बरेच जण तर शाळा सुटली की चिप्सचे पॅकेट्स घेऊन गाडीची वाट बघत किंवा गाडीत बसल्यावर कर्रम् कुर्रम् करत चिप्स खात असतात.
पण हे चिप्स तळण्यासाठी चांगल्या प्रतीचे तेल वापरले जात नाही, तसेच यामध्ये चिप्स कुरकुरीत राहावे, चव छान लागावी म्हणून अनेक कृत्रिम घटक वापरले जातात. त्याशिवाय जास्त प्रमाणात मीठ सुद्धा असते. थोडेसे चवीला खारट असतात की नाही हे चिप्स? कृत्रिम घटक असलेले, मीठ जास्त असलेले चिप्स खाल्ले की, आपले केस लवकर पांढरे होऊ शकतात, केस गळू लागतात, भूक लागत नाही त्यामुळे आपण जेवत नाही आणि शारीरिक वाढ सुद्धा नीट होत नाही. एवढंच नाही तर रोज रोज चिप्स खाल्ल्यामुळे डोळ्यांची ताकद सुद्धा कमी होते, पोटात जंत होतात आणि पोटदुखी सुरू होते. या गोष्टी तुम्हाला माहीत होत्या का?
एवढे दुष्परिणाम असलेले चिप्स तुम्हाला आता खावेसे वाटणार का? अजिबात नाही ना? हे असले चिप्स खाण्यापेक्षा तुम्ही हेल्दी चिप्स घरी बनवून खाऊ शकता आणि तेही वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळे चिप्स.
फणसाचे पौष्टिक चिप्स
आता सध्या बाजारात फणस विकायला येतात. छानसा कच्चा फणस किंवा फणसाचे कच्चे गरे आणावे. ते स्वच्छ करून आतील बी काढावे. एक एक गरा कापून करंगळीच्या आकाराचे लांबट चिप्स करावे आणि खोबरेल तेल गरम करून चिप्स छान तळून घ्यावे.
गरम असताना त्यावर चवीपुरते मीठ, थोडीशी हळद आणि आवडत असल्यास मिरची पूड टाकून हलवावे आणि कुरकुरीत चिप्स फस्त करावे.
हे गऱ्यांचे चिप्स बाजारात मिळणाऱ्या इतर चिप्सपेक्षा खूप चविष्ट तर लागतातच आणि हे खाल्ले की आरोग्याला त्रासही होत नाही. कारण यात कोणतेही रासायनिक घटक म्हणजेच कृत्रिम रंग किंवा प्रिझर्वेटिव्ह घातलेले नसतात. त्याशिवाय आई स्वयंपाकघराची स्वच्छता रोज करत असते आणि पदार्थ बनवताना सुद्धा स्वच्छतेची काळजी घेते.
कुरकुरीत आणि चवीला मस्त लागतात म्हणून एका वेळी खूप चिप्स मात्र खायचे नाहीत हं, एकावेळी जास्त चिप्स खाल्ले असता पोटात दुखू शकते. हे चिप्स फणसाच्या गऱ्यांपासून बनवलेले असल्यामुळे पौष्टिक असतात. फणसाचे आरोग्यासाठी फायदे याआधी तुम्ही जाणून घेतलेच आहेत, त्यामुळे ते सगळे फायदेही तुम्हाला माहीत आहेत आणि हे चिप्स घरीच बनवलेले असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि याचे आरोग्यावर दुष्परिणामही होत नाहीत. आजच फणसाचे कुरकुरीत चिप्स करण्याचा बेत करताय ना?
- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य